पणजी : अनुसूचित जमातींना घटनात्मक हक्क प्राप्त होण्यासाठी एसटी आरक्षण कायद्यात हस्तक्षेप करणे योग्य नव्हे, असे गोवा सरकारने प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले आहे. २००३ साली समावेश होऊनही चार विधानसभा निवडणुकांमध्ये आरक्षण न मिळालेल्या या समुदायांना आगामी निवडणुकीतही आरक्षण नाकारल्यास आणखी पाच वर्षे वाट पाहावी लागेल, असे सरकारने नमूद केले आहे.
एसटी आरक्षणाला लुसियो फर्नांडिस यांनी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेसंदर्भात केंद्राने प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर राज्य सरकारतर्फे आदिवासी कल्याण संचालनालयाच्या संचालकांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. समाजाच्या गरजा ओळखण्यासाठी विधिमंडळ हेच सर्वोत्तम न्यायाधीश आहे, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
४० सदस्यसंख्या असलेल्या गोवा विधानसभेत २००७, २०१२, २०१७ आणि २०२२ साली झालेल्या निवडणुकांमध्ये अनुसूचित जमातींसाठी एकही जागा राखीव ठेवण्यात आली नाही. परिणामी, घटनात्मक मान्यता असूनही कुणबी, गावडा आणि वेळीप या समुदायांचे सदस्य राज्यातील इतर अनुसूचित जमातींप्रमाणेच विधानसभेत राजकीय प्रतिनिधित्वापासून वंचित राहिले आहेत, असे सरकारने नमूद केले आहे.
- १९ डिसेंबर १९६१ रोजी पोर्तुगीज राजवटीतून मुक्त होऊन गोवा केंद्रशासित प्रदेश म्हणून भारत संघराज्याचा भाग बनला.
- यानंतर भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३४२(१) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून राष्ट्रपतींनी १२ जानेवारी १९६८ रोजी जारी केलेल्या आदेशाद्वारे धोडिया, दुबला, नाईकडा, सिद्दी आणि वारली या पाच समुदायांचा अनुसूचित जमातींमध्ये समावेश केला होता.
- मात्र, गोव्यातील प्रमुख असलेल्या कुणबी, गावडा आणि वेळीप समुदायांना त्यातून वगळल्याने त्यांच्या दर्जाच्या मान्यतेसाठी या समाजांमध्ये प्रचंड असंतोष व नाराजी निर्माण झाली होती.
- अखेर आवश्यक प्रक्रिया पूर्ण होऊन ‘अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आदेश (सुधारणा) अधिनियम, २००२’ हा ७ जानेवारी २००३ रोजी अधिसूचित करण्यात आला आणि या तिन्ही समुदायांचा अनुसूचित जमातींच्या यादीत समावेश होऊन ते घटनात्मक व कायदेशीर लाभांसाठी पात्र ठरले.
तीन समुदायांच्या समावेशामुळे गोव्यातील अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येत लक्षणीय वाढ झाली. २०११ च्या जनगणनेनुसार राज्याची एकूण लोकसंख्या १४,५८,५४५ इतकी होती, तर अनुसूचित जमातींची लोकसंख्या १,४९,२७५ म्हणजेच एकूण लोकसंख्येच्या अंदाजे १०.२ टक्के नोंदवली गेली.
लोकसंख्या आणि रचनेतील या बदलामुळे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३३२ अंतर्गत राजकीय प्रतिनिधित्वाची घटनात्मक हमी अंमलात आणण्यासाठी योग्य कायदेशीर उपाययोजना करणे आवश्यक झाले, असे प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले आहे.
अनुसूचित प्रवर्गात नवीन समुदायांचा समावेश केल्यानंतरच्या परिणामांचा मुद्दा ‘वीरेंद्र प्रताप विरुद्ध युनियन ऑफ इंडिया’ या खटल्यात सर्वोच्च न्यायालयासमोर आला होता.
या खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि संविधानाच्या अनुच्छेद ३३२ ची खरी भावना व हेतू विचारात घेऊन राष्ट्रपतींनी ‘संसदीय आणि विधानसभा मतदारसंघांमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या प्रतिनिधित्वाची पुनर्रचना (तिसरा) अध्यादेश’ जारी केला, असे सरकारने नमूद केले आहे.
- याचिका दाखल करण्यातील विलंब कायद्याच्या संरक्षणकारी स्वरूपाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. या कायद्यामुळे गोव्यातील अनुसूचित जमातींना आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये आरक्षणाद्वारे राजकीय प्रतिनिधित्वाचा घटनात्मक अधिकार बजावता येणार आहे.
- आधीच सुमारे २३ वर्षांपासून या अधिकारापासून वंचित राहिलेल्या या समुदायांच्या संदर्भात इतक्या उशिरा कायद्याच्या अंमलबजावणीत हस्तक्षेप केल्यास त्यांच्या हितांवर गंभीर परिणाम होईल आणि त्यांना राजकीय आरक्षणासाठी आणखी पाच वर्षांच्या निवडणूक चक्राची वाट पाहावी लागेल, असे गोवा सरकारने प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले आहे.


