पणजी : कदंब वाहतूक महामंडळातर्फे (Kadambar Transport Corporation Limited KTCL) ‘माझे ॲप’सुरू करण्यात आले आहे. याद्वारे कदंब बस तिकीट, दुचाकी पायलट तसेच पिंक रिक्षाचे ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे. ॲपद्वारे बसचे ट्रॅकिंग करणे शक्य होणार आहे. त्यामुळे बस स्थानकावर किती वाजता येणार याची माहिती मिळेल. अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष आणि आमदार उल्हास तुयेकर यांनी दिली. शनिवारी ॲपच्या अनावरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी महामंडळाचे एमडी रोहन कासकर, महेंद्र पेडणेकर, सुरेश ठाकूर, रिबेका लोबो व अन्य अधिकारी उपस्थित होते.
तुयेकर यांनी सांगितले की, ‘माझे ॲप’द्वारे कदंबचे तिकीट बुक केल्यावर मोबाईलवर तिकीट उपलब्ध होईल. बस मध्ये हे तिकीट स्कॅन करता येईल. तिकीटाची वैधता २४ तासांची असणार आहे. बसचे लाईव्ह लोकेशन समजल्याने प्रवाशांना वेळेवर बस स्थानकावर पोहोचण्यात मदत होणार आहे.
येणाऱ्या काळात ‘माझे ॲप’द्वारे कुरिअर, टॅक्सी बुकिंग आदी सेवा सुरू करण्यात येणार आहेत. तसेच कदंब स्मार्ट कार्ड घेणे व रिचार्ज करणे या सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या ॲपमुळे प्रवाशांचा फायदा होणार आहे. अधिकाधिक प्रवाशांनी या ॲपचा वापर करावा.
कासकर यांनी सांगितले की, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही मागील काही वर्षांत महामंडळाच्या सेवा सुलभ करत आहोत. माझे ॲप हा त्यातील एक टप्पा आहे. ॲपद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे कदंब बसचे व्यवस्थापन अधिक सुटसुटीत होण्यास मदत होणार आहे.
याशिवाय आम्ही लवकरच महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र ॲप सुरू करण्याचा विचार करत आहोत. येत्या काही वर्षांत महामंडळामध्ये तंत्रज्ञानावर आधारित सेवा वाढवण्यात येणार आहेत. माझे ॲप मध्ये सहभागी होणाऱ्या पायलट, रिक्षा चालकांसाठी १५ लाख रुपयांपर्यंत विमा देण्यात आला आहे.


