मडगाव : फातोर्डा वाहतूक पोलीस ठाण्यातील एका उपनिरीक्षकाने लॉरी चालकाला कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला असून, या घटनेवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणी प्राथमिक चौकशीअंती अहवाल वरिष्ठांकडे पाठवून दिल्याची माहिती दक्षिण गोवा वाहतूक पोलीस उपअधीक्षकांनी दिली आहे.
फातोर्डा वाहतूक पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाने वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या एका लॉरी चालकाला कानशिलात लगावल्याचा प्रकार व्हिडिओच्या माध्यमातून समाजमाध्यमांवर पसरल्यानंतर समाजाच्या विविध स्तरांतून या मारहाणीचा निषेध करण्यात येत आहे. या कथित प्रकाराची गंभीर दखल घेत संबंधित वाहतूक पोलीस उपनिरीक्षकाविरोधात अधिकृत तक्रार दाखल करणार असल्याचा इशारा ऑल गोवा लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत चारी यांनी दिला.
टॅक्सी चालकाने वाहतूक नियमांचे उल्लंघन केले असल्यास संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी कायदेशीर प्रक्रियेनुसार त्याच्यावर कारवाई करायला हवी होती; मात्र त्याला शारीरिक मारहाण करण्याचा अधिकार कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला नाही, असे मत समाजमाध्यमांवरून व्यक्त होत आहे.
दुसरीकडे, काही जणांकडून वाहतूक पोलिसांची बाजू मांडली जात असून, संबंधित लॉरी चालकाने वाहतुकीला अडथळा निर्माण होण्यासारखी गाडी उभी करून ठेवली होती आणि त्याच्या गाडीत मद्याच्या बाटल्याही आढळून आल्याचे सांगितले जात आहे. मद्यपान केल्याबाबतची तपासणी करण्यासाठी पोलिसांनी सांगितले असता त्या चालकाने उलट उत्तरे देत तपासणीस टाळाटाळ केली; त्यामुळे या प्रकारात वाहतूक पोलिसांची भूमिका चुकीची नसल्याचे काही व्यक्तींकडून समाजमाध्यमांवर मांडण्यात येत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेण्यात आली असून, सत्यता तपासून घडलेल्या प्रकाराची चौकशी केली जात आहे. प्राथमिक चौकशी करून अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला असून त्यांच्याकडून पुढील निर्णय घेण्यात येईल, असे दक्षिण गोवा वाहतूक पोलीस उपअधीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांनी स्पष्ट केले.
पोलिसांनी कर्तव्य पार पाडत असताना मर्यादेचे उल्लंघन करू नये आणि कायद्यानुसार कारवाई व्हावी, पण मारण्याचा अधिकार कोणालाही नाही, असे सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत सांगितले. चालकाला अशा प्रकारे कानशिलात लगावणे हे भारतीय संविधानाच्या कलम २१ चे उल्लंघन असून प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, तसेच संबंधित अधिकाऱ्याने आपल्या पदाचा आणि अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोपही होत आहे.
वाहतूक पोलिसाकडून चालकाला मारहाण झालेल्या प्रकाराची मानवाधिकार आयोगाने स्वेच्छादखल घेत वाहतूक पोलीस अधीक्षक व वाहतूक पोलीस उपअधीक्षकांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणाचा अहवाल १० जानेवारी २०२७ पर्यंत सादर करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत.


