महिला आरक्षणाच्या विधेयकासाठी केंद्राला डीएमकेचा पाठिंबा

शरद पवार गटाचाही पाठिंबा मिळणार असल्याची चर्चा; आजच्या इंडि आघाडीच्या बैठकीवर पवार गटाचा बहिष्कार : लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून केंद्र सरकारला मोठे राजकीय बळ मिळण्याची शक्यता आहे. तामिळनाडूमधील द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) पक्षाने केंद्र सरकारच्या सुधारित मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
महिला आरक्षणाच्या विधेयकासाठी केंद्राला डीएमकेचा पाठिंबा

नवी दिल्ली : लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून केंद्र सरकारला मोठे राजकीय बळ मिळण्याची शक्यता आहे. तामिळनाडूमधील द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) पक्षाने केंद्र सरकारच्या सुधारित मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. डीएमकेचे लोकसभेतील २२ खासदार या विधेयकाला पाठिंबा देणार असल्याने भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) आवश्यक दोन-तृतीयांश बहुमत मिळवण्याच्या प्रयत्नांना मोठी मदत होऊ शकते.

आठ खासदार असलेल्या राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचा शरद पवार गट ही केंद्र सरकारच्या विधेयकांना पाठिंबा देणार असल्याची चर्चा रंगली आहे. आज शनिवारी दिल्लीत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीला राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या शरद पवार गटाने बहिष्कार घातला. त्यामुळे या चर्चेवर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे.

डीएमके पक्षाचे अध्यक्ष आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी मांडलेल्या दोन प्रमुख मागण्या केंद्र सरकारने मान्य केल्यानंतर डीएमकेने हा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. तामिळनाडूचा लोकसभेतील सध्याचा ७.१८ टक्के जागांचा वाटा कायम ठेवणे आणि राज्यांमधील जागांचे सध्याचे प्रमाण पुढील २५ वर्षे कायम राखणे, या दोन अटींवर पक्षाने पाठिंबा दर्शवला आहे.

डीएमके खासदारांच्या बैठकीत यासंदर्भात ठराव मंजूर करून पक्षाची भूमिका निश्चित करण्यात आली. त्यामुळे विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या संयुक्त रणनीतीपासून डीएमके काहीसे दूर गेल्याचे चित्र आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नवी दिल्लीत बोलावलेल्या विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीलाही स्टॅलिन उपस्थित राहिले नाहीत.

केंद्र सरकारच्या सुधारित प्रस्तावानुसार, प्रत्येक राज्यातील लोकसभा जागांमध्ये समान ५० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, राज्यांमधील सध्याचे जागांचे प्रमाण कायम ठेवले जाणार आहे. यामुळे लोकसभेची कमाल सदस्यसंख्या ८५० पर्यंत वाढवण्याचा सरकारचा विचार आहे. सध्याच्या जागा वाटपाचे प्रमाण पुढील २५ वर्षे कायम ठेवण्याची तरतूदही प्रस्तावात आहे.

यापूर्वी स्टॅलिन यांनी लोकसंख्येच्या आधारावर मतदारसंघ पुनर्रचना केल्यास दक्षिणेकडील राज्यांचे संसदेतील प्रतिनिधित्व कमी होण्याची भीती व्यक्त केली होती. त्यामुळे १९७१ च्या जनगणनेच्या आधारे निश्चित झालेले राज्यांमधील जागांचे प्रमाण कायम ठेवण्याची मागणी त्यांनी केली होती. केंद्राने या मागण्या मान्य केल्याने डीएमकेने विधेयकाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे.

दरम्यान, महिला आरक्षणाच्या ३३ टक्के तरतुदीची २०२९ पासून लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये अंमलबजावणी करण्यासाठी मतदारसंघ पुनर्रचना आवश्यक असल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये सरकारने आणलेले संविधान (१३१ वी दुरुस्ती) विधेयक लोकसभेत आवश्यक दोन-तृतीयांश बहुमत न मिळाल्याने फेटाळले गेले होते. त्यामुळे यावेळी डीएमकेच्या पाठिंब्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

संविधानाच्या कलम ३६८ नुसार घटनादुरुस्ती विधेयक मंजूर होण्यासाठी सभागृहाच्या एकूण सदस्यसंख्येचे बहुमत आणि उपस्थित राहून मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी किमान दोन-तृतीयांश सदस्यांचा पाठिंबा आवश्यक असतो. त्यामुळे डीएमकेच्या २२ लोकसभा खासदारांसह राज्यसभेतील आठ खासदारांची भूमिका केंद्रासाठी महत्त्वाची ठरू शकते.

आजच्या इंडि आघाडीच्या बैठकीला पवार गटाची दांडी

आठ खासदार असलेला राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचा शरद पवार गट ही केंद्र सरकारच्या विधेयकांना पाठिंबा देणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यातूनच आज शनिवारी दिल्लीत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीला राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या शरद पवार गटाने बहिष्कार टाकला. काल जितेंद्र आव्हाड यांनी एनडीएप्रणित केंद्र सरकारच्या विधेयकांना राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे खासदार पाठिंबा देणार असल्याचे सांगितले होते.

यासंदर्भात पत्रकारांनी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना विचारले असता; विधेयकांचा मसुदा हातात पडल्यावरच भाष्य करणे योग्य ठरणार असल्याचे सांगितले. यासंदर्भात सभागृहातच नेमकी भूमिका घेऊ असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले. नेमकी भूमिका उघड करण्यास नकार दिला.

हेही वाचा
सर्व पहा