उत्तर गोव्यात एका दिवसात २८७ महसूल प्रकरणांचा निपटारा

उपक्रमाला प्रतिसाद : विशेष न्यायालयांत २२४ म्युटेशन प्रकरणे निकाली

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
3 hours ago
उत्तर गोव्यात एका दिवसात २८७ महसूल प्रकरणांचा निपटारा

म्हापसा येथे विशेष कोर्ट प्रक्रियेदरम्यान म्युटेशन व इतर अर्जांचा निपटारा करताना बार्देश मामलेदार कृष्णा गावस.

पणजी : उत्तर गोवा जिल्हा प्रशासनाने शनिवारी जिल्ह्यात आयोजित केलेल्या विशेष महसूल न्यायालयांमध्ये एकूण २८७ प्रलंबित प्रकरणे आणि अर्जांचा निपटारा केला. यामध्ये म्युटेशनच्या २२४ प्रकरणांचा, तर ‘माझे घर’ योजनेच्या २१ अर्जांचा समावेश आहे. प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी करून नागरिकांना जलद न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने सरकारने नियमित कामकाजाव्यतिरिक्त दर शनिवारी विशेष सुनावण्या घेण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या मोहिमेचा हा तिसरा शनिवार होता.
तिसवाडी, बार्देश, पेडणे, डिचोली आणि सत्तरी या महसूल कार्यक्षेत्रांत अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, मामलेदार आणि संयुक्त मामलेदार यांनी विशेष सुनावण्या घेतल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कामकाजावर देखरेख ठेवली.
यावेळी प्रलंबित फायलींची तपासणी, संबंधित पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेणे आणि जमीनविषयक प्रकरणांवर योग्य आदेश देण्याची कार्यवाही करण्यात आली. ‘माझे घर’ योजना आणि हक्क प्रदान करण्याच्या प्रकरणांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.
रुका २०१६ अंतर्गत १२, भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १२६ अंतर्गत ५, गोवा वृक्ष संवर्धन कायद्याच्या कलम १२ अंतर्गत १, १९७२ पूर्वीच्या बांधकामांचे नियमितीकरण १३, वीस कलमी कार्यक्रमांतर्गत ६ आणि सरकारी जमिनीच्या नियमितीकरणाची २ प्रकरणे निकाली काढण्यात आली.
यापूर्वी ३९५ म्युटेशन प्रकरणांचा निपटारा
या उपक्रमाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यापूर्वी २१ नोव्हेंबर रोजी झालेल्या विशेष न्यायालयांमध्ये ३९५ म्युटेशन प्रकरणे आणि ‘माझे घर’ योजनेचे ८१ अर्ज निकाली काढण्यात आले होते.
मामलेदार आणि उपजिल्हाधिकारी न्यायालयांमध्ये प्रकरणे प्रलंबित असलेल्या नागरिकांनी जलद निवारणासाठी आवश्यक कागदपत्रांसह नियोजित शनिवारच्या सुनावणीला उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

विविध कायद्यांतील प्रकरणे निकाली
शनिवारी निकाली काढलेल्या प्रकरणांमध्ये मुंडकार खरेदी (कलम १६(१)) ८, मुंडकार घोषणा (कलम ८(अ) आणि २९(४)) ६, कृषी कुळवहिवाट घोषणा (कलम ७ आणि ८(अ)) ६, कुळवहिवाट खरेदी (कलम १८(क)) ४ आणि उपजिल्हाधिकारी विशेष न्यायालयातील १८ प्रकरणांचा समावेश आहे.      

हेही वाचा
सर्व पहा