म्हापसा : रायबंदर येथील गुन्हे शाखेच्या कार्यालयात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज पाहण्यास हरकत घेणारा निलंबित पोलीस निरीक्षक विकास देयकर याचा अर्ज मेरशी येथील पॉक्सो न्यायालयाने फेटाळला आहे.
सुनावणीवेळी आरोपीच्या वतीने अॅड. डी. धोंड यांनी तर सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता एस. नागवेकर यांनी बाजू मांडली. तर, पीडित पक्षाच्या हस्तक्षेप अर्जावर अॅड. एस. नाईक यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने स्पष्ट केले की, जामिनाचा निर्णय घेताना गुन्ह्याचे गांभीर्य आणि प्राथमिक पुरावे तपासणे आवश्यक असते. साक्षीदारांच्या जबाबाप्रमाणेच इलेक्ट्रॉनिक पुरावेही तपासले जाऊ शकतात आणि कायद्यात याला कोणताही प्रतिबंध नाही. शिवाय, तपास अधिकार्यांकडे असलेल्या पेनड्राईव्हची प्रत पाहिली जाणार असल्याने मूळ सील उघडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे नमुद करत न्यायालयाने आरोपीचा हरकत अर्ज फेटाळला व वरील आदेश जारी केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० रोजी होणार असून ही सुनावणी बंद दरवाजाआड होणार आहे.
दरम्यान, मुरगाव तालुक्यातील पीडित मुलीने विकास देयकर याच्यावर २५ जुलै आणि २७ ऑक्टोबर २०२६ रोजी आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. या तक्रारीनंतर जुने गोवा पोलीस निरीक्षक सतीश पडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक अंजली धुळापकर यांनी देयकर आणि एका महिलेविरोधात गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, पोलिसांनी देयकर आणि संबंधित महिलेला नोटीस जारी करून चौकशी केली. त्यात त्यांच्या जबाबात तफावत आढळल्यानंतर ४ नोव्हेंबर रोजी त्या दोघांना अटक केली होती. या प्रकरणात दोन्ही संशयितांनी पॉक्सो न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे.
बंद दाराआड सीसीटीव्ही फुटेजची पाहणी
संबंधित सीसीटीव्ही फुटेजची प्रत न्यायालयात इन- कॅमेरा (बंद दाराआड) पाहण्याचे निर्देश न्यायाधीश डॉ. पूजा कवळेकर यांनी दिले आहेत. जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान सीसीटीव्ही फुटेज पाहण्यास हरकत घेणार्या आरोपी देयकर याचा अर्ज निकाली काढताना न्यायालयाने हा आदेश दिला आहे.


