‘सुवर्ण मयुर’ पुरस्कार तीयागो गॅडीश यांना प्रदान करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत आशुतोष गोवारीकर व इतर. (कैलास नाईक)
गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी
५७ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) प्रतिष्ठेचा ‘सुवर्ण मयूर’ पुरस्कार तीयागो गॅडीश दिग्दर्शित ‘आकी’ या पोर्तुगीज चित्रपटाने पटकावला. यंदाचे ‘आयसीएफटी-युनेस्को गांधी’ पदक फायअल सोयासल दिग्दर्शित ‘रहमा’ चित्रपटाला मिळाले. सर्वोत्कृष्ट वेब सिरीज (ओटीटी) पुरस्कार ‘मेड इन इंडिया ए टायटन स्टोरी’ या सिरीजने जिंकला.
शनिवारी इफ्फीचा समारोप सोहळा डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर पार पडला. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, महोत्सवाचे संचालक आशुतोष गोवारीकर, अभिनेते ऋषभ शेट्टी उपस्थित होते. कार्यक्रमात आदित्य जांभळे यांना सन्मानित करण्यात आले.
मुख्यमंत्री म्हणाले की, इफ्फी हा कल्पक मनांचा महोत्सव आहे. दरवर्षी इफ्फी आयोजित करण्याचा आम्हाला अभिमान आहे. मागील काही वर्षांत चित्रपट निर्माते गोव्यात चित्रीकरणाला प्राधान्य देत आहेत. विदेशी चित्रपट निर्मात्यांनी गोव्यात येऊन चित्रीकरण तसेच पोस्ट प्रोडक्शन करावे. गोव्यात चित्रपट निर्मिती करून ‘ऑरेंज इकोनॉमी’ला चालना द्यावी. इफ्फीमध्ये कोकणी चित्रपटांचे प्रमाण वाढले पाहिजे. चित्रपट निर्मात्यांनी ‘मेक इन गोवा’नुसार गोव्यात चित्रपट निर्मिती करून ते जगभरात पोहोचवावेत. गोवा मनोरंजन संस्थेने सहा सामांजस्य करार केले आहेत. यामुळे येथे चित्रपट निर्मितीचे शिक्षण तसेच रोजगार संधी वाढणार आहे.


