मडगाव : चांदर येथे झालेल्या घरफोडीचा छडा लावत मायणा कुडतरी पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली आहे. गस्तीवरील पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही कारवाई करण्यात आली असून, संशयितांकडून चोरीची पितळी भांडी तसेच घरफोडीसाठी वापरलेली हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मायणा कुडतरी पोलीस उपनिरीक्षक नारायण पिंगे चांदर परिसरात गस्तीवर होते. यावेळी नंबर प्लेट झाकलेली गडद निळ्या रंगाची मारुती व्हॅन संशयास्पदरीत्या फिरताना त्यांच्या निदर्शनास आली. पोलिसांनी वाहन अडवून त्यातील तिघांची चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. परिसरात येण्याचे समाधानकारक कारण न दिल्याने पोलिसांनी वाहनाची झडती घेतली. त्यावेळी वाहनात पहार, हातोडा, स्क्रू-ड्रायव्हर आणि पितळी भांडी आढळून आली.
यानंतर पोलिसांनी शुभम संजयकुमार राणा (वय २६, रा. मोडेभाट, धर्मापूर), अरबाज नूरअहमद नदाफ (वय १८, रा. मोडेभाट, धर्मापूर; मूळ रा. बेळगाव, कर्नाटक) आणि मन्नान तौसिफ सय्यद (वय २०, रा. सां जुझे दी अरीयाल) यांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीदरम्यान चांदर येथे घरफोडी केल्याची माहिती उघड झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित घरमालकाशी संपर्क साधला. चांदर येथील एडवर्ड मिल्टन डिसिल्वा (वय ४२) यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयितांविरोधात चोरीप्रकरणी गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली आहे.
दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक अक्षत आयुष, मडगावचे उपअधीक्षक गुरुदास कदम आणि मायणा कुडतरीचे पोलीस निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नारायण पिंगे पुढील तपास करीत आहेत. संशयितांनी अन्य ठिकाणीही घरफोड्या केल्या आहेत का, याचाही तपास पोलीस करीत आहेत.


