पेडणे : कोरगाव येथे झालेल्या ग्रामसभेत हिरोजी वाडा–देऊळवाडा परिसरातील जमिनीच्या कथित परस्पर विक्रीचा मुद्दा तीव्रपणे गाजला. स्थानिकांना विश्वासात न घेता बाहेरील व्यक्तींना जमीन विकून संभाव्य प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांच्या बाजूने ठाम भूमिका घेत संबंधित विषयावर ठराव मंजूर करण्यात आला.

माजी शिक्षक भालचंद्र हिरोजी यांनी ग्रामसभेत या प्रश्नाची सविस्तर मांडणी करताना सांगितले की, हिरोजी वाडा–देऊळवाडा येथील जमीन अनेक पिढ्यांपासून हिरोजी कुटुंबीयांच्या वास्तव्याशी निगडित आहे. या जमिनीत काजू बागायती, शेती, घरे, जनावरांचे गोठे आणि पारंपरिक स्मशानभूमी असून, जमीन विक्री व संभाव्य विकासकामांमुळे स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. पूर्वजांनी कष्टाने ही जमीन विकसित केल्याचे सांगत प्रणिता हिरोजी यांनी परस्पर जमीन विक्री व बाहेरील व्यक्तींकडून प्रकल्प उभारण्याच्या प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कोणताही प्रकल्प तसेच वृक्षतोड सहन केली जाणार नाही, अशी भूमिका हिरोजी कुटुंबीयांनी स्पष्ट केली. भालचंद्र हिरोजी, गुणाजी हिरोजी, सुरेश हिरोजी, नामदेव हिरोजी, सागर हिरोजी, शिवानंद हिरोजी, वृषाल हिरोजी, सोपान हिरोजी, महेश हिरोजी, प्रसाद हिरोजी, एकनाथ हिरोजी आणि साहिल हिरोजी यांनी एकत्र येत स्थानिकांच्या हक्कांसाठी आवाज उठवला.

ग्रामसभेत सरपंच लौकिक शेट्ये, उपसरपंच दिवाकर जाधव आणि पंचमंडळाने स्थानिकांच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही दिली. कोरगाव पंचायत क्षेत्रात कोणत्याही बेकायदेशीर कृतींना किंवा स्थानिकांना त्रास देणाऱ्या बाबींना थारा दिला जाणार नाही, असे सांगत सरपंच लौकिक शेट्ये यांनी ग्रामस्थांच्या हितासाठी सदैव तत्पर राहण्याचा विश्वास दिला. गरज पडल्यास ग्रामस्थांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून लढण्याचीही तयारी त्यांनी दर्शवली.

दरम्यान, या प्रकरणी गोवन वरताच्या प्रतिनिधीने संपर्क साधल्यानंतर आमदार प्रवीण आर्लेकर यांनीही ग्रामस्थांच्या पाठीशी राहून शक्य ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असून, ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानत अभिनंदन केले. कोरगाव देवस्थान समितीनेही स्थानिकांच्या बाजूने राहण्याची भूमिका घेतली. जमीन, पर्यावरण आणि स्थानिकांचे हक्क जपण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येण्याची गरज देवानंद गावडे यांनी व्यक्त केली, तर बाहेरील व्यक्तींच्या खरेदीमुळे स्थानिक विस्थापित होऊ नयेत म्हणून विरोध कायम राहील, असे विनिता मांद्रेकर यांनी नमूद केले.

ग्रामसभेत जमीन प्रश्नासोबतच मागील ठरावांचा आढावा घेण्यात आला. रस्ते, पर्यावरण, पाणी समस्या, गटार व्यवस्था आणि इतर विकासकामांवर चर्चा होऊन प्रलंबित कामे पुढे नेण्याचे आश्वासन सचिवांनी दिले. सभेला सरपंच, उपसरपंच, पंच सदस्य नीता नर्से, अब्दुल नाईक, उमेश च्यारी, देविदास नागवेकर, कल्पिता कलशावकर, पंचायत सचिव, निरीक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्थानिकांच्या जमिनी व पारंपरिक हक्कांच्या रक्षणासाठी गावातील एकजूट कायम राहणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले.


