राष्ट्रीय महामार्गाला भोम ग्रामस्थांचा पाठिंबा

भोम ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्गाला पाठिंबा दर्शवला असला, तरी कामापूर्वी बाधित कुटुंबांचे पुनर्वसन आणि मंदिर व सती देवस्थान सुरक्षित ठेवण्याचे लेखी आश्वासन देण्याची ठाम मागणी केली आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
2 hours ago
राष्ट्रीय महामार्गाला भोम ग्रामस्थांचा पाठिंबा

पणजी : भोम येथील राष्ट्रीय महामार्गाच्या उभारणीला ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शवला असला, तरी बांधकाम सुरू करण्यापूर्वी आपल्या प्रमुख मागण्या पूर्ण करण्याची अट त्यांनी ठेवली आहे. या प्रकल्पात गावातील मंदिर आणि सती देवस्थानाला कोणताही धक्का लागणार नाही, याचे लेखी आश्वासन देण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच या महामार्गाच्या कामात ज्या कुटुंबांची घरे पाडली जाणार आहेत, त्यांचे योग्य आणि सन्मानजनक पुनर्वसन आधी पूर्ण करावे, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी मांडली आहे.

महामार्गाचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू होण्यापूर्वीच पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे. आमच्या या मागण्या मान्य केल्यास ग्रामस्थ संमती करारावर स्वाक्षरी करण्यास तयार आहेत, अशी माहिती संजय नाईक यांनी दिली. दरम्यान, आमदार गोविंद गावडे यांनीही या पुनर्वसन आराखड्यावर चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर भोम पंचायतीने आमदार गोविंद गावडे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना गावात येऊन ग्रामस्थांशी थेट संवाद साधण्याचे निमंत्रण दिले आहे. गावचा वारसा आणि बाधित कुटुंबांचे हित जपूनच विकासकामे पुढे न्यावीत, अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.

हेही वाचा
सर्व पहा