राज्यात आतापर्यंत ९१,७६९ जणांकडून स्वयंजनगणना नोंदणी

कुशावती जिल्ह्यात भेडसावतेय नेटवर्कची समस्या : स्वयंनोंदणीचे प्रमाण ६५.५२ टक्के

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
राज्यात आतापर्यंत ९१,७६९ जणांकडून स्वयंजनगणना नोंदणी

पणजी : जनगणनेच्या स्वयंनोंदणीसाठी आतापर्यंत अवघा एक दिवस शिल्लक असताना राज्यात ९१,७६९ जणांकडून स्वयंनोंदणी पूर्ण झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून ही माहिती मिळाली. उत्तर व दक्षिण गोव्याच्या तुलनेत कुशावती जिल्ह्यात नेटवर्कची समस्या आहे. यामुळे कुशावतीतून तुलनेने कमी प्रतिसाद मिळाला आहे.

उत्तर गोव्यातून ३२७४९, दक्षिणेतून ५०४६७ तर कुशावती जिल्ह्यातून ८५५३ जणांनी जनगणनेची स्वयंनोंदणी केली आहे. उत्तर गोव्यात  २२०७०, दक्षिण गोव्यात २१२०० तर कुशावती जिल्ह्यात ५०२१ मिळून राज्यात ४८२९१ जणांकडून स्वयंनोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. एक दिवस शिल्लक असल्याने राज्यात १४००६० जणांकडून स्वयंनोंदणी पूर्ण होणे शक्य आहे. हे प्रमाण ६५.५२ टक्के होते. उत्तर गोव्यात ५९.७४ टक्के, दक्षिण गोव्यात ७०.४२ टक्के तर कुशावती जिल्ह्यात ६३.०१ टक्के असे स्वयंनोंदणीचे प्रमाण आहे. आता १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष जनगणनेला सुरवात होणार आहे. कुशावती जिल्ह्यात केपे, काणकोण, सांगे व धारबांदोडा तालुके येतात. येथे नेटवर्कची समस्या असल्याने स्वयंनोंदणी करताना बऱ्याच अडचणी येत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी गुरूदास देसाई यांनी दिली.

गोव्यातील २०२७ च्या जनगणनेचा दुसरा स्वयंनोंदणीचा टप्पा १६ नोव्हेंबर रोजी सुरू झाला. उद्या ३० नोव्हेंबर रोजी हा टप्पा संपत आहे. यानंतर १ डिसेंबर २०२६ ते ४ जानेवारी २०२७ या कालावधीत घरोघरी जाऊन माहिती गोळा केली जाईल. या प्रक्रियेत संपूर्ण राज्यातील २६ जनगणना क्षेत्रांचा समावेश असेल. यासाठी ३,२७२ इनुमरेटर्स आणि ५४५ पर्यवेक्षकांची व्यवस्था करण्यात आली आहे. या २६ क्षेत्रांमध्ये १४ शहरी आणि १२ ग्रामीण भागांचा समावेश असून, त्यांचे नेतृत्व उपजिल्हाधिकारी आणि मामलेदार करतील. स्वयंनोंदणीत विशेष 'स्वयं-गणना पोर्टल'द्वारे आपल्या कुटुंबाची माहिती भरण्याची व्यवस्था आहे.

प्रश्नावलीमध्ये जन्मलेली मुले आणि सध्या जिवंत असलेली मुले यांची संख्या समाविष्ट असेल. याव्यतिरिक्त, कोविड-१९ लसीकरण, बँक खाती, मोबाईल क्रमांक, आधार, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन्स हे प्रश्न आहेत. वैयक्तिक माहिती जनगणना कायद्याच्या कलम १५ अंतर्गत सुरक्षित ठेवली जाईल आणि तिचा वापर केवळ सांख्यिकीय उद्देशांसाठीच केला जाईल.

गोव्यातील बेघर व्यक्तींची गणना करण्यासाठी विशेष व्यवस्था केली जाईल.

गोव्यातील शेवटची लोकसंख्या जनगणना २०११ मध्ये झाली होती. तेव्हा राज्याची लोकसंख्या १५ लाखांहून अधिक होती. त्यानंतर जनगणनेची कोणतीही अद्ययावत आकडेवारी उपलब्ध नाही. संपूर्ण देशातील ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, जनगणनेचे मुख्यालय नवीन लोकसंख्याविषयक आकडेवारी जाहीर करेल. याआधीच्या गृह-सूची टप्प्यातील माहितीही प्रसिद्ध केली जाईल. ज्यामध्ये वैयक्तिक लोकसंख्येऐवजी घरांची स्थिती आणि घरातील पायाभूत सुविधांशी संबंधित माहिती समाविष्ट आहे. गोव्यातील २०२७ च्या जनगणनेसाठी ५ जानेवारी २०२७ रोजीची मध्यरात्र (००:०० वाजता) ही संदर्भ तारीख असेल आणि ५ ते ९ जानेवारी या कालावधीत पुनरावलोकन फेरी आयोजित केली जाईल.

ऑफलाइन माहिती भरता येणार

स्वयं-गणना ॲप्लिकेशन ऑफलाइन करणेही शक्य आहे. इंटरनेट उपलब्ध झाल्यावर ही माहिती सिंक केली जाते. रहिवासी आपली प्रगती जतन करून नंतर पुन्हा प्रक्रिया सुरू ठेवू शकतात. मात्र, एकदा माहिती सादर केल्यानंतर पोर्टलद्वारे माहितीमध्ये बदल करता येणार नाहीत. काही दुरुस्ती करायची असल्यास, जनगणना कर्मचारी जेव्हा घरी येतील, तेव्हा त्यांच्या मदतीने ती करणे शक्य आहे.

हेही वाचा
सर्व पहा