श्री कमळेश्वर मंदिर, कोरगाव

दोन नंदींची दुर्मीळ परंपरा, स्वयंभू शिवलिंग, भव्य दीपस्तंभ, रथोत्सव आणि शतकानुशतके जपली गेलेली ग्रामदैवतावरील श्रद्धा यामुळे कोरगावचे श्री कमळेश्वर मंदिर पेडणे तालुक्याच्या धार्मिक-सांस्कृतिक वारशातील एक वैशिष्ट्यपूर्ण श्रद्धास्थान म्हणून आपली ओळख टिकवून आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
27th November, 05:53 pm
श्री कमळेश्वर मंदिर, कोरगाव

पेडणे तालुक्यातील कोरगाव गावाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेत श्री कमळेश्वर देवस्थानाला विशेष स्थान आहे. प्राचीन वास्तू, स्वयंभू शिवलिंग, भव्य दीपस्तंभ आणि पारंपरिक उत्सवांसोबतच या मंदिराचे सर्वांत वेगळे वैशिष्ट्य म्हणजे एकाच मंदिर परिसरात असलेले दोन नंदी. सामान्यतः शिवमंदिरासमोर एक नंदी पाहायला मिळतो. मात्र, श्री कमळेश्वर मंदिरातील दोन नंदी भाविकांसह पर्यटकांचेही लक्ष वेधून घेतात.

स्थानिक परंपरेनुसार श्री कमळेश्वर हे कोरगावचे ग्रामदैवत मानले जाते. मंदिराला सुमारे आठशे वर्षांची प्राचीन परंपरा असल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या गर्भगृहात श्री कमळेश्वराचे स्वयंभू शिवलिंग असून बाहेरील परिसरात पादुका तसेच गणपती व देवी अंबा भवानी यांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या उजव्या बाजूस जैन मंदिर, तर डाव्या बाजूस आकर्षक आणि भव्य दीपस्तंभ आहे.


दोन नंदींची रंजक आख्यायिका

मंदिरातील दोन नंदींबाबत स्थानिकांमध्ये एक रंजक आख्यायिका सांगितली जाते. पूर्वी मंदिर परिसरात झाडाझुडपांची मोठी गर्दी होती. त्या काळात जवळच एका ब्राह्मणाचे घर होते आणि त्याच्याकडे गाय होती. ती गाय दररोज जंगलाच्या दिशेने जात असे आणि काही काळानंतर परत येत असे. मात्र, तिचे दूध कमी होत असल्याचे लक्षात आल्याने गाय नेमकी कुठे जाते, याचा शोध घेण्यात आला.

आख्यायिकेनुसार गाय जंगलातील एका विशिष्ट जागी जाऊन आपले दूध पान्हा सोडत असल्याचे दिसून आले. ती जागा स्वच्छ करून खोदकाम केले असता तेथे शिवलिंग असल्याचे आढळून आले. पुढे त्याच जागेवर मंदिर उभारण्यात आले, अशी श्रद्धा आहे. आजही ही कथा मंदिराच्या प्राचीनत्वाशी आणि स्थानिकांच्या श्रद्धेशी जोडली जाते.


श्री कमळेश्वर आणि श्री सोमेश्वराचे नंदी

देवस्थानाशी संबंधित परंपरेनुसार मंदिरातील दोन नंदींपैकी एक नंदी श्री कमळेश्वर शंकराचा, तर दुसरा मांद्रे येथील श्री सोमेश्वर देवाचा मानला जातो. त्यामुळे दोन्ही नंदींची भाविक भक्तिभावाने पूजा-अर्चा करतात. दोन देवस्थानांमधील धार्मिक संबंध आणि श्रद्धेचे प्रतीक म्हणूनही या परंपरेकडे पाहिले जाते. पूर्वी ज्या जागी हे नंदी होते, त्याच परिसरात मंदिर होते, असेही सांगितले जाते. कालांतराने मंदिराचा विस्तार झाला. मात्र, नंदींचे धार्मिक महत्त्व कायम राखण्यात आले.

भव्य दीपस्तंभ मंदिराची शान

श्री कमळेश्वर मंदिरासमोरील भव्य दीपस्तंभ हे मंदिराचे आणखी एक आकर्षण आहे. स्थानिक माहितीनुसार पूर्वीचा दीपस्तंभ अखंड दगडातून घडविलेला होता. कालांतराने मंदिर परिसरात बदल झाले, तरी दीपस्तंभाचे पारंपरिक स्वरूप जपण्याचा प्रयत्न करण्यात आला. मंदिर परिसरातील धार्मिक वास्तुरचनेतही विविध परंपरांचा संगम दिसतो. श्री कमळेश्वराचे शिवलिंग, देवी-देवतांच्या मूर्ती, जैन मंदिर आणि नारायण मंदिर यांमुळे हा संपूर्ण परिसर धार्मिकदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण ठरतो.


सात दिवसांचा पारंपरिक रथोत्सव

श्री कमळेश्वर मंदिराचा वार्षिक रथोत्सव हा गावातील प्रमुख धार्मिक सोहळ्यांपैकी एक आहे. कार्तिक त्रिपुरी पौर्णिमेच्या काळात सुरू होणारा हा उत्सव सात दिवस साजरा केला जातो. देवस्थानात श्रावणी सोमवार, शिमगोत्सव, रामनवमी आणि इतर धार्मिक उत्सव साजरे केले जातात. देवतांच्या पालख्या गावातील विविध भागांत नेण्याची परंपराही जपली जाते.

हेही वाचा
सर्व पहा