Home >> गोवा >> भाजपचा काँग्रेस कार्यालयावर मोर्चा

भाजपचा काँग्रेस कार्यालयावर मोर्चा

राहुल गांधींचा निषेध

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
3 hours ago
भाजपचा काँग्रेस कार्यालयावर मोर्चा

पणजी : राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरासमोर केलेले आंदोलन केवळ राजकीय फायद्यासाठी होते. त्यांना देशातील विद्यार्थ्यांशी घेणे देणे नाही. राहुल गांधी यांनी देशातील सर्वोच्च पदावरील व्यक्तीच्या घरासमोर गुंडगिरी करण्याचा प्रयत्न केला. याचा आम्ही जाहीर निषेध करतो. विरोधी पक्षांना देशात अराजकता आणायची आहे. त्यांनी युवकांची दिशाभूल करू नये; असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केले.

बुधवारी भाजपतर्फे काँग्रेसच्या पणजी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. दामू नाईक म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशासह संपूर्ण जगात एक मानाचे स्थान आहे. मागील बारा वर्षांच्या कालावधीत मोदी सरकारने युवकांसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. ‘खेलो इंडिया’, ‘स्टार्ट अप इंडिया’ सारख्या योजनांचा अनेक युवकांना लाभ झाला आहे. 

आमच्या सरकारचा एक मोठा आधार स्तंभ म्हणजे युवाशक्ती आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण खात्याने सीबीआयकडे तक्रार नोंदवली आहे. याबाबत एसआयटी देखील स्थापन करण्यात येणार आहे. मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याविषयी नैतिक जबाबदारी घेऊन विद्यार्थ्यांची माफी मागितली आहे. 

सध्या या प्रकरणी चौकशी सुरू आहे

असे असूनही हा विषय पुन्हा बाहेर काढला जात आहे.  या दोन दिवसांत झालेल्या आंदोलनांमागे काही विदेशी शक्तींचा हात असण्याची शक्यता आहे.  अमेरिकेच्या सीआयएला देखील या कारस्थानाची माहिती होती. त्यामुळेच सीआयएने त्यांच्या नागरिकांना भारतात २० आणि २१ जुलै रोजी सांभाळून राहण्याचा इशारा दिला होता.

काही देशद्रोही लोकांना देशात दंगल घडवून येथील राज्यसत्ता अस्तीर करायची आहे. यामुळेच युवकांची दिशाभूल करून त्यांच्या तोंडात भलतेच बोल घातले जात आहेत. याचा फायदा घेत विरोधक सरकार अस्तीर करण्याचा प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा
सर्व पहा