
पणजी: मागील काही वर्षांत देशात नीटसह अन्य पेपर फुटीची प्रकरणे घडत आहेत. याची जबाबदारी घेऊन मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देणे आवश्यक आहे. तसेच जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला केल्या प्रकरणी मंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली.
बुधवारी पक्षाच्या शिष्टमंडळाने याबाबत राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन दिले. यावेळी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, आमदार कार्लुस फेरेरा, सुनील कवठणकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
चोडणकर यांनी सांगितले की, केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर मागील दहा वर्षांत १५२ वेळेस पेपर फुटी झाली आहे. यामुळे सुमारे ९ कोटी विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. पेपरफुटी मुळे देशभरात २५ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याची जबाबदारी घेत राजीनामा देणे आवश्यक आहे.
आपल्या न्याय हक्कांसाठी जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अमानुष पद्धतीने लाठी हल्ला करण्यात आला. त्यांच्यावर अश्रू धूर सोडण्यात आला. याबाबत जाब विचारणारे विरोधी पक्षनेते राहुल गांधींना देखील चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेण्यात आले.
या सर्व प्रकारातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आपली जबाबदारी निभावण्यात अपयशी ठरल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे त्यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा देणे आवश्यक आहे. आज आम्ही राज्यपालांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन त्यांना दिले आहे.
त्यांनी राष्ट्रपती तसेच केंद्र सरकारला हे निवेदन पाठवावे अशी विनंती आम्ही केली आहे. याशिवाय आम्ही या निवेदनात राहुल गांधी यांना चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेतल्याचा निषेध देखील केला आहे.
विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करणे, विद्यार्थ्यांवरील एफआयआर मागे घेणे, याप्रकरणी संसदेत चर्चा करणे; अशा मागण्या देखील आम्ही केल्याचे चोडणकर यांनी सांगितले.