अनमोडजवळ दोन ट्रकची समोरासमोर धडक; दोन्ही चालक गंभीर जखमी

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
22nd July, 12:07 pm
अनमोडजवळ दोन ट्रकची समोरासमोर धडक; दोन्ही चालक गंभीर जखमी

जोयडा : गोवा–बेळगाव राष्ट्रीय महामार्गावरील अनमोडजवळील केसलरॉक क्रॉस येथे मंगळवारी मध्यरात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास गोव्याकडे जाणारा आणि गोव्यातून येणारा अशा दोन मालवाहू ट्रकचा भीषण अपघात झाला.  या अपघातात दोन्ही ट्रकचे चालक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने बेळगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

धडक इतकी जोरदार होती की; दोन्ही ट्रकच्या केबिनचा पूर्णपणे चुराडा झाला. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी चालकांना ट्रकमधून बाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी रवाना करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याची कार्यवाही करण्यात आली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.  रामनगर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा
सर्व पहा