Home >> देश -परदेश >> पाकिस्तानात एचआयव्हीचा उद्रेक; १३० हून अधिक बाधित

पाकिस्तानात एचआयव्हीचा उद्रेक; १३० हून अधिक बाधित

गंभीर निष्काळजीपणामुळे संसर्ग

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
3 hours ago
पाकिस्तानात एचआयव्हीचा उद्रेक; १३० हून अधिक बाधित

 कराची :  पाकिस्तानातील कराची शहरातील सरकारी कुलसुम बाई वालिका (KBV) रुग्णालयात झालेल्या गंभीर निष्काळजीपणामुळे एचआयव्ही (HIV) संसर्गाचा मोठा उद्रेक झाल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत १३० हून अधिक जणांना HIVची लागण झाली असून त्यामध्ये बहुसंख्य लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेमुळे पाकिस्तानच्या आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सिंध सरकारने दिलेल्या माहितीनुसार, केबीव्ही (KBV)  रुग्णालयाच्या परिसरात १०,५००हून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १२० जण एचआयव्ही (HIV) पॉझिटिव्ह आढळले. कराचीतील लांधी येथील आणखी एका सेस्सी (SESSI)  आरोग्य केंद्रात करण्यात आलेल्या तपासणीत १० नवीन रुग्ण आढळल्याने बाधितांची संख्या १३० वर पोहोचली आहे.

तपासात धक्कादायक निष्काळजीपणा उघड

चौकशी अहवालात रुग्णालय प्रशासनाकडून संसर्ग प्रतिबंधक नियमांचे पालन न करणे, सुरक्षा साधनांचा अपुरा वापर, तसेच एकदाच वापरायच्या सिरिंजच्या अयोग्य हाताळणीसारख्या गंभीर त्रुटी उघड झाल्या आहेत.

पहिल्या चौकशीत बालरोग विभागातील १६ मुलांना एचआयव्हीची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतरच्या सविस्तर अहवालात ७८ संसर्गित रुग्ण आणि सहा मृत्यूंची नोंद करण्यात आली. या प्रकरणात प्रशासनीय व देखरेखीतील हलगर्जीपणासाठी अनेक अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात आले आहे.

३७ कर्मचाऱ्यांना नोटिसा, फौजदारी कारवाईची तयारी

या प्रकरणी ३७ डॉक्टर आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. दोषी आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे सिंध सरकारने स्पष्ट केले आहे.

नवीन उपाययोजना जाहीर

या घटनेनंतर पाकिस्तान सरकारने जानेवारी २०२७ पासून पुन्हा वापरता येणाऱ्या पारंपरिक सिरिंजच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच देशभरात शस्त्रक्रियेपूर्वी एचआयव्ही  तपासणी अनिवार्य करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

बाधित मुलांच्या दीर्घकालीन उपचारांसाठी दोन अब्ज पाकिस्तानी रुपयांचा विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे. स्वतंत्र आयसोलेशन वॉर्ड आणि रुग्णालयाच्या संसर्ग नियंत्रण प्रणालीचे स्वतंत्र लेखापरीक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पाकिस्तानातील एचआयव्ही संकट अधिक गंभीर

जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि युनेड्स ( UNAIDS)  यांच्या अहवालानुसार, पाकिस्तानमध्ये एचआयव्ही संसर्ग झपाट्याने वाढत आहे. २०१० मध्ये सुमारे १६ हजार वार्षिक रुग्ण असताना २०२४ मध्ये हा आकडा ४८ हजारांपर्यंत पोहोचला आहे. सध्या देशात सुमारे ३.५ लाख नागरिक एचआयव्हीसह जीवन जगत आहेत. त्यापैकी जवळपास ८० टक्के लोकांना स्वतःला संसर्ग झाल्याची माहितीच नाही. ही बाब अधिक चिंताजनक असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले आहे.