Home >> गोवा >> तर कुणाचेही तिकीट कापले जाणार नाही : मंत्री तवडकर

तर कुणाचेही तिकीट कापले जाणार नाही : मंत्री तवडकर

राजकीय नेतृत्व खंबीर होण्यासाठी समाजाचा पाठिंबा गरजेचा

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
2 hours ago
तर कुणाचेही तिकीट कापले जाणार नाही : मंत्री तवडकर

मडगाव : आदिवासी समाजाला सामाजिकदृष्ट्या दर्जा मिळण्यासाठी पूर्ण समाजाची प्रगती होण्याची गरज आहे. यासाठी राजकीय नेतृत्व खंबीर असण्याची गरज आहे. कुणाचेही तिकीट कापण्याची ताकद होता कामा नये; त्यासाठी समाजाने पाठीशी राहण्याची गरज आहे. पुढील दहा वर्षांत आदिवासी समाजाचा विकास व कायापालट करण्याची ताकद आपणा सर्वांत असून; त्यासाठी रोडमॅप केला जात आहे, अशी माहिती मंत्री रमेश तवडकर यांनी दिली.

गोवा आदिवासी विकास संचालनालय आणि गोवा आदिवासी संशोधन संस्थेतर्फे गोवा ट्रायबल व्हिजन २०३७ या एकदिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. ही परिषद बुधवारी उत्तोर्डा येथील एका रिसॉर्टमध्ये झाली.

 या परिषदेला सभापती डॉ. गणेश गावकर, आदिवासी कल्याण मंत्री डॉ. रमेश तवडकर (Tribal welfare Minister Ramesh Tawadkar), आमदार गोविंद गावडे, गोवा अनुसूचित जाती, जमाती आयोगाचे अध्यक्ष रवींद्र गावकर, राज्य एसटी वित्त आणि विकास महामंडळाचे अध्यक्ष वासुदेव मेंग गावकर, उटाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप उपस्थित होते. 

 यावेळी मार्गदर्शन करताना मंत्री तवडकर यांनी सांगितले की, राज्य सरकार स्वयंपूर्ण गोवा २०३७ करू पाहत असताना स्वयंपूर्ण आदिवासी होण्याचीही गरज आहे. यासाठी गोवा आदिवासी व्हिजन २०३७ची आवश्यकता आहे. आदिवासी समाजातील अनेक व्यक्ती हुशार आहेत. त्यांच्या ज्ञानाचा फायदा समाजासाठी होण्याची गरज आहे. आदिवासी समाजातील विविध संस्कृती जतन करण्याची व संवर्धनासाठी रोडमॅप आवश्यक आहे.

 करमळी व पर्वरी येथील जागा व प्रकल्प या वादावर कायम चर्चा न करता आम्ही यापुढे जाण्याची गरज आहे. आदिवासी निधी न वापरता आतापर्यंत सुमारे ३०० कोटींचे नुकसान करून घेतले आहे. कलम २७५चा अभ्यास करण्याची गरज आहे. समाजाच्या विकासासाठी ११ मुद्द्यांवर चर्चा होण्याची व त्यावर आवश्यक उपाययोजना होण्याची गरज आहे.

स्पर्धात्मक शिक्षणाशिवाय विकासाचा पर्याय नाही. समाजातील कुणाचेही शिक्षण पैशामुळे बाकी राहणार नाही यासाठी योजना काढण्यात आलेली आहे. पण योजनेसाठी आवश्यक अर्ज येत नाहीत. कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याची गरज आहे. पारंपरिक पद्धती बाजूला सारून नव्या बियाण्याचा वापर करत योजनाचा लाभ घेत शेती केल्यास आर्थिक लाभ होतो यावर काम होण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

आदिवासी संस्कृती हीच गोव्याची खरी संस्कृती असून आपणच आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगत संवर्धन करण्याची गरज आहे. गावातील संसाधनाचा वापर करत गावपण टिकवण्याची गरज आहे. लोककलेला पुढे आणण्याची आवश्यकता आहे. आदिवासी युवक विकास सेंटर निर्मितीची गरज असून यातून रोजगाराचा प्रश्न कमी होऊ शकतो. आदिवासी समाजातील लोकांसाठी विविध योजना आहेत. त्याचा फायदा घेत त्याचा वापर त्याच कामासाठी वापरण्याची गरज असल्याचे तवडकर यांनी स्पष्ट केले.

 श्रमदानातून ७८ घरे बांधलेली असून एकाच वेळी शंभर घरे बांधण्याचा विचार आहे. हा उपक्रम सामाजिक बांधिलकीतून  होण्याची गरज आहे व आमच्या समाज बांधवांची काळजी आपणच घेण्याची गरज आहे.  निधी योग्य कामासाठी वापरण्याची व आणखी निधी मागण्याची आवश्यकता आहे.

हा व्हिजन डॉक्युमेंट पुढील सहा महिन्यात समाजातील सर्वांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. २०३७ पर्यंत गोव्यातील आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास करणे शक्य आहे. समाजातील भेदभाव विसरून व मतभेद बाजूला ठेवून एकत्रित काम करण्यासाठी असून समाजाचे सहकार्य व पाठिंबा मिळण्याची गरज आहे व हे नक्कीच होईल, असा विश्वास व्यक्त केला. 

हेही वाचा
सर्व पहा