Home >> गोवा >> सावईकरांच्या ‘वाळवी’ पोस्टवरून राजकारण तापले

सावईकरांच्या ‘वाळवी’ पोस्टवरून राजकारण तापले

काँग्रेस नेत्यांची खरमरीत टीका : फेसबुकवरून पोस्ट हटवली; मात्र सावईकर आपल्या मतावर ठाम

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
4 hours ago
सावईकरांच्या ‘वाळवी’ पोस्टवरून राजकारण तापले

पणजी : कॉक्रोच जनता पार्टीचे दिल्लीत सुरू असलेले आंदोलन आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी गोव्यात झालेले आंदोलन यानंतर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. नरेंद्र सावईकर यांनी कॉक्रोचला वाळवी असे संबोधणारी पोस्ट सोशल मीडियावर केल्यानंतर त्यांच्यावर टीकेचा भडीमार झाला. त्या पोस्टवरही लोकांनी संताप व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्यानंतर ॲड. सावईकर यांनी लगेच ती पोस्ट डिलीट केली. काँग्रेसने या प्रकरणानंतर सावईकरांना लक्ष्य करत वाळवीला प्रत्युत्तर म्हणून भाजप म्हणजे कॅन्सर असल्याची टीका केली. सावईकर यांनी मात्र ‘आपण जे पोस्ट केले होते त्यात काही गैर नाही’, असे म्हटले आहे.

दरम्यान, सावईकर यांच्या विधानामुळे भाजपने २४ तासांत माफी मागावी अन्यथा आंदोलन करू, असा इशारा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुनील कवठणकर यांनी दिला आहे. ॲड.  सावईकर यांनी ‘कॉक्रोचेस विथ दी टर्माईट्स! सेव्ह द नेशन!’ अशा प्रकारची पोस्ट करून भारताच्या नकाशाला झुरळ वाळवी पोखरत असल्याचे चित्र पोस्ट केले होते. त्यानंतर त्यांच्या पोस्टवर टीकेचा भडीमार सुरू झाला. सावईकर यांनी त्यानंतर लगेच ती पोस्ट डिलीट केली.

ॲड. सावईकर यांनी आपली पोस्ट डिलीट केली; मात्र त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ‘झुरळ आणि वाळवी घर संपवतात. आपण तेवढेच बोललो,  जे सत्य आहे. मला बोलण्याचा अधिकार आहे, त्यामुळे मी ती पोस्ट केली. काँग्रेस त्यावर काय म्हणते त्याकडे मी लक्ष देत नाही’, असे म्हटले आहे. आंदोलनाचा आणि माझ्या पोस्टचा काहीही संबंध नाही. कोणी संबंध लावत असतील तर त्यांचा हेतू लक्षात येतो. माझ्या फेसबुकवरून ती पोस्ट ते काम पाहणाऱ्याकडून डिलीट झाली; पण ट्वीटरवर ती पोस्ट आहे, असे ॲड. . सावईकर म्हणाले.

कोण काय म्हणाले ?

विद्यार्थ्यांनी न्यायाची मागणी केली आहे. भाजप सरकारने विद्यार्थ्यांना मारहाण केली. काँग्रेस विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी आहे.

 कॅ. विरियातो फर्नांडिस, खासदार, काँग्रेस

ॲड. सावईकर यांचा निषेध. हा गोव्यातील आणि देशातील तरुणांचा अवमान आहे.

_ पूजन मालवणकर, युवा विभागप्रमुख, आप

कॉक्रोच आणि वाळवी हे दोन्ही किटाणू एकाच कुटुंबातील आहेत. सावईकर यांनी काहीच चुकीचे म्हटलेले नाही. झुरळ ही वाईट प्रवृत्ती त्यापासून राष्ट्र वाचवायला हवेच.

_ सिद्धार्थ कुंकळ्येकर, नेते, भाजप

देशाच्या युवकांना वाळवी म्हणून त्यांचा अवमान करू नका. आज ज्या तरुणांना तुम्ही वाळवी म्हणता त्यांच्याकडून उद्या निवडणुकीत उद्या टाळ्या वाजवून घेणार आहात.

ॲड. अमित पालेकर, नेते, काँग्रेस  

हेही वाचा
सर्व पहा