Home >> गोवा >> विकासासोबतच गोव्याचे पर्यावरण, स्थानिकांचे हित जपणे अावश्यक!

विकासासोबतच गोव्याचे पर्यावरण, स्थानिकांचे हित जपणे अावश्यक!

वैज्ञानिक डॉ. फर्नांडिस : ‘प्राईड ऑफ आगोंद’तर्फे १०० पेक्षा जास्त नागरिक सन्मानित

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
20th July, 07:52 pm
विकासासोबतच गोव्याचे पर्यावरण, स्थानिकांचे हित जपणे अावश्यक!

पैंगीण : गोवा मुक्तीनंतर पर्यटनामुळे राज्याचा विकास झाला असला, तरी पर्यावरण संवर्धन आणि स्थानिकांच्या हिताचे रक्षण करणे तितकेच महत्त्वाचे आहे. पर्यटनाचा लाभ स्थानिकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि विकासाचा समतोल राखण्यासाठी दूरदृष्टीने निर्णय घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. रॉडनी फर्नांडिस यांनी केले.
आगोंद पंचायत क्षेत्रातील ‘प्राईड ऑफ आगोंद’ संघटनेने रविवारी भुरिम, आगोंद येथील श्री रंजनी पाईक सभागृहात आगोंदचा अभिमान सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. याप्रसंगी वैज्ञानिक डॉ. फर्नांडिस प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर निवृत्त शिक्षक व ज्येष्ठ पत्रकार नारायण देसाई, कृषी खात्याचे विभागीय अधिकारी महेंद्र पागी व पत्रकार बेर्नाद फर्नांडिस आदी उपस्थित होते.
डॉ. फर्नांडिस पुढे म्हणाले, पर्यटनाचा सर्वाधिक फायदा स्थानिक नागरिकांना झाला पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने शाश्वत विकास साध्य होईल. आज कचरा व्यवस्थापन हा गंभीर प्रश्न बनला आहे. विशेषतः प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. स्वच्छतेची सुरुवात प्रत्येकाने आपल्या घरापासून केली पाहिजे.
आगोंद येथे भरपूर प्रतिभा आहे. त्या प्रतिभेला योग्य दिशा आणि संधी मिळणे गरजेचे आहे. तसेच विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून नागरिक जबाबदारी रुजवण्यासाठी शाळांमधूनच त्याचे शिक्षण सुरू झाले पाहिजे. यासाठी जपानचा आदर्श आपल्या समोर आहे. तेथील नागरिकांची स्वच्छता, शिस्त आणि सार्वजनिक मालमत्तेबद्दलची जबाबदारी अनुकरणीय आहे. आगोंद पंचायत क्षेत्रातील विविध क्षेत्रात प्रभावी काम करून ठसा उमटविणाऱ्या १०० पेक्षा जास्त नागरिकांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले तर व्यासपीठावरील मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सुरुवातीला सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. बेर्था फर्नांडिस यांनी आभार मानले.

पर्यटनाचा विकास करताना लोकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि स्थानिकांच्या हिताला प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे. अशा संतुलित दृष्टिकोनातूनच गोव्याचा विकास खऱ्या अर्थाने शाश्वत आणि सर्वसमावेशक होईल.
- डॉ. रॉडनी फर्नांडिस, वैज्ञानिक

हेही वाचा
सर्व पहा