
पणजी : ताळगावच्या आमदार आणि माजी मंत्री जेनिफर मोन्सेरात यांच्या अंत्यदर्शनाला मोठी गर्दी झाली. पणजी, ताळगावसह राज्यभरातील लोक त्यांच्या अंतिम दर्शनासाठी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
उपस्थितांनी मंत्री बाबुश मोन्सेरात, महापौर रोहित मोन्सेरात यांचे साश्रू नयनांनी सांत्वन केले. जेनिफर यांचा मृतदेह त्यांच्या ताळगावच्या घरी दुपारी ३ वाजेपर्यंत ठेवण्यात येणार आहे. यानंतर दुपारी ३.३०ला ताळगाव चर्चमध्ये मास होणार आहे. नंतर सांतीनेज स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जातील.
जेनिफर यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी ताळगावच्या घरात सकाळ पासून लोकांच्या रांगा लागल्या होत्या. सामान्य नागरिकांसह मंत्री, आमदारांनी त्यांचे अंत्य दर्शन घेतले. केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, मंत्री सुभाष शिरोडकर, मंत्री रोहन खंवटे, मंत्री दिगंबर कामत, आमदार गोविंद गावडे, आमदार रुडॉल्फ फर्नांडिस, आमदार डिलायला लोबो, माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो, उत्पल पर्रीकर, तुलिओ डिसोझा यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
नेहमीच लोकांसाठी काम केले
राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितले की, जेनिफर मोन्सेरात यांनी नेहमीच लोकांसाठी काम केले. विधानसभेत मी सभापती असताना त्यांची उत्तरे संयमी आणि अभ्यासू होती. जनतेसाठी कसे काम करायचे असते याचे त्या उत्तम उदाहरण होत्या. सर्वांना घेऊन पुढे जाणे हा एक त्यांच्यातील चांगला गुण होता. त्या पक्षाच्या समर्पित कार्यकर्त्या होत्या. दामू नाईक यांनी जेनिफर हसतमुख आणि अभ्यासू व्यक्ती असल्याचे सांगितले. पक्षाने दिलेले जबाबदारी जेनिफर यांनी नेहमीच योग्य पद्धतीने पार पाडल्याचे नाईक यांनी सांगितले.
अन्य मतदारसंघांतील लोकांसाठी त्या काम करत होत्या
मंत्री सुभाष शिरोडकर यांनी जेनिफर हसत खेळत स्वभावाच्या असल्याचे सांगितले. केवळ ताळगाव नाही तर राज्यातील अन्य मतदारसंघांतील लोकांसाठी त्या काम करत होत्या; असे ते म्हणाले. आमदार गोविंद गावडे म्हणाले की, जेनिफर यांचे व्यक्तिमत्व शांत स्वभावाचे होते. विधानसभेत त्यांचे आसन माझ्या जवळच होते. त्या नेहमीच नवीन गोष्टी शिकण्यासाठी उत्सुक होत्या. त्या लोकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असत. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून बाहेर पडण्याची शक्ती देवो.
(बातमी अपडेट होत आहे.)