Home >> गोवा >> फोंड्यातील सीसीटीव्ही बंद अवस्थेत; पोलिसांना तपासात अडथळे

फोंड्यातील सीसीटीव्ही बंद अवस्थेत; पोलिसांना तपासात अडथळे

खासगी कॅमेऱ्यांचा आधार : नवे कॅमेरे बसविण्याची नागरिकांची मागणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
20th July, 07:50 pm
फोंड्यातील सीसीटीव्ही बंद अवस्थेत; पोलिसांना तपासात अडथळे

फोंडा शहरातील वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी काही वर्षांपूर्वी बसविण्यात आलेला ‘तिसरा डोळा’ म्हणजेच सीसीटीव्ही कॅमेरे सध्या बंद अवस्थेत आहेत. वेळोवेळी दुरुस्ती न झाल्याने हे कॅमेरे केवळ शोभेच्या वस्तू बनले आहेत. कॅमेरे बंद असल्याने पोलिसांना गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी खासगी दुकानांतील कॅमेऱ्यांचा आधार घ्यावा लागत असून, शहरात आवश्यक ठिकाणी लवकर नवीन सीसीटीव्ही बसविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

२२ कॅमेरे निष्क्रिय; खासगी कॅमेऱ्यांवर पोलिसांचा भर

काही वर्षांपूर्वी दक्षिण गोव्याचे माजी खासदार नरेंद्र सावईकर यांनी त्यांच्या खासदार निधीतून फोंडा शहरात एकूण २२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. या कॅमेऱ्यांची देखभाल एका खासगी एजन्सीकडे सोपविण्यात आली होती. मात्र, योग्य देखभाल न झाल्याने काही वर्षांतच हे सर्व कॅमेरे बंद पडले. परिणामी, गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांना खासगी आस्थापनांमधील सीसीटीव्ही फुटेजवर अवलंबून राहावे लागत आहे.

शहरातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे कॅमेरे अत्यंत उपयुक्त ठरत होते. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर याच कॅमेऱ्यांच्या आधारे कारवाई केली जात होती. मात्र, कॅमेरे बंद पडल्याने आता पोलिसांना प्रत्यक्ष रस्त्यावर उभे राहून वाहतूक नियंत्रण आणि कारवाई करावी लागत आहे. वाढती वाहतूक आणि शहरातील चोरीसारख्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर सीसीटीव्ही यंत्रणा पुन्हा सुरू करण्याची गरज अधोरेखित होत आहे.

आमदार नसल्याने प्रश्न रखडल्याची चर्चाकृषी मंत्री रवी नाईक यांच्या निधनानंतर फोंडा मतदारसंघ सध्या आमदाराविना आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वतः या मतदारसंघातील विकासकामांवर लक्ष ठेवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा कार्यान्वित करण्याबाबत अद्याप कोणतीही ठोस हालचाल झालेली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
तातडीने कॅमेरे बसविण्याची मागणी

सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फोंडा शहरात वाढती वाहतूक आणि वाढणारे गुन्हे लक्षात घेता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नितांत गरज आहे. गुन्ह्यांचा तपास आणि वाहतूक नियंत्रणासाठी ही यंत्रणा अत्यंत उपयुक्त ठरते. त्यामुळे सरकारने शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी तातडीने नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी शिवा नाईक यांनी केली.

जंक्शनवर विशेष लक्ष ठेवण्याची गरज

शहरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनावर देखरेख ठेवण्यासाठी तसेच कुर्टी, बायथाखोल आणि फर्मागुडी जंक्शन परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आवश्यक आहे. या माध्यमातून तालुक्यातील वाढत्या गुन्ह्यांचा छडा लावणेही पोलिसांसाठी सोपे होईल. त्यामुळे सरकारने याबाबत तातडीने निर्णय घेऊन आवश्यक ठिकाणी आधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा उभारावी, अशी मागणी अॅड. रामदास मयेकर यांनी केली.

हेही वाचा
सर्व पहा