ऑनलाइन अपॉइंटमेंट नसल्यास रांगेत उभे रहावे लागणार

पणजी : गोवा वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) टोकन देण्याची पद्धत बंद करण्यात आली आहे. त्यामुळे ऑनलाइन अपॉइंटमेंट नसलेल्या रुग्णांना आता प्रत्यक्ष रांगेत उभे राहून आपला क्रमांक घ्यावा लागणार आहे. याबाबत जीएमसी प्रशासनाने परिपत्रक जारी केले आहे.
जीएमसीमध्ये ओपीडीसाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट प्रणाली सुरू करण्यात आली असून, सर्व विभागांतील सेवांसाठी रुग्णांनी ऑनलाइन अपॉइंटमेंट घेणे अपेक्षित आहे. यापूर्वी ज्यांनी ऑनलाइन अपॉइंटमेंट घेतली नव्हती, त्यांच्यासाठी ओपीडी काऊंटरवर टोकन देण्याची सुविधा उपलब्ध होती. टोकन मिळाल्यानंतर रुग्णांना सतत रांगेत उभे राहण्याची गरज भासत नव्हती.
मात्र, अधिकाधिक रुग्णांनी ऑनलाइन अपॉइंटमेंटचा वापर करावा, या उद्देशाने टोकन पद्धत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. या निर्णयामुळे आता ऑनलाइन अपॉइंटमेंट न घेतलेल्या रुग्णांना ओपीडीमध्ये प्रत्यक्ष रांगेत उभे राहून क्रमांक घ्यावा लागणार असून, त्यामुळे जीएमसीच्या ओपीडीमध्ये पुन्हा रांगा लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.