Home >> गोवा >> दमदार पावसामुळे सत्तरीतील ‘वॉटर राफ्टिंग’ला नवसंजीवनी

दमदार पावसामुळे सत्तरीतील ‘वॉटर राफ्टिंग’ला नवसंजीवनी

पर्यटनाला गती : पर्यटकांकडून प्रतिसाद, १५ दिवसांचे बुकिंग जवळपास पूर्ण

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
19th July, 09:08 pm
दमदार पावसामुळे सत्तरीतील ‘वॉटर राफ्टिंग’ला नवसंजीवनी

वाळपई : गेल्या चार दिवसांपासून घाटमाथ्यावर आणि सत्तरी तालुक्यात झालेल्या दमदार पावसामुळे म्हादई नदीच्या पाण्याच्या प्रवाहात मोठी वाढ झाली आहे. परिणामी, पावसाने दडी मारल्यामुळे बंद पडण्याच्या मार्गावर आलेल्या प्रसिद्ध ‘व्हाईट वॉटर राफ्टिंग’ उपक्रमाला पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळाली आहे. उस्ते येथून या साहसी पर्यटनाला पुन्हा दिमाखात सुरुवात झाली आहे.
काही दिवसांपूर्वी पावसाने दडी मारल्यामुळे नदीतील पाण्याची पातळी लक्षणीय घटली होती. त्यामुळे हा लोकप्रिय उपक्रम ठप्प होण्याची चिन्हे निर्माण झाली होती आणि या व्यवसायावर अवलंबून असलेले स्थानिक व्यावसायिक, मार्गदर्शक व वाहनचालक यांच्यात चिंतेचे वातावरण होते. मात्र, आता म्हादई नदी पुन्हा खळाळून वाहू लागल्याने चित्र पूर्णपणे पालटले आहे. आवश्यक जलपातळी उपलब्ध होताच पर्यटन विभागाने राफ्टिंगला हिरवा कंदील दाखवला आहे.
सत्तरी तालुक्यातील नगरगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील उस्ते ते सावर्डे या सुमारे १२ किलोमीटर लांबीच्या नदीमार्गावर हे राफ्टिंग चालते. म्हादईचा वेगवान प्रवाह, नैसर्गिक वळणे आणि दुतर्फा असलेले पश्चिम घाटाचे घनदाट जंगल यामुळे हा प्रवास पर्यटकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरत आहे. या साहसी खेळामुळे गोव्याच्या अंतर्गत भागातील निसर्गसंपदा आणि समृद्ध जैवविविधतेचे दर्शन पर्यटकांना घडत आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांच्या कार्यकाळात कर्नाटकातील दांडेलीच्या धर्तीवर या प्रकल्पाची संकल्पना प्रत्यक्षात आली होती. आज हा प्रकल्प गोव्यातील पावसाळी पर्यटनाचे प्रमुख आकर्षण बनला आहे. यामुळे ग्रामीण भागातील होमस्टे, रिसॉर्ट, रेस्टॉरंट, स्थानिक वाहतूकदार आणि लघुउद्योजकांना थेट रोजगार मिळत असून स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागत आहे.
पर्यटकांचा उदंड प्रतिसाद
राफ्टिंग पुन्हा सुरू होताच राष्ट्रीय व स्थानिक स्तरावरून पर्यटकांनी मोठी गर्दी केली असून पुढील १५ दिवसांचे बुकिंग जवळपास पूर्ण झाले आहे. दरम्यान, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आधुनिक राफ्ट, लाइफ जॅकेट आणि हेल्मेटसह प्रशिक्षित मार्गदर्शक तैनात करण्यात आले आहेत. प्रशासनाने पर्यटकांना सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे, नदी परिसरात स्वच्छता राखण्याचे आणि प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन केले आहे.