
पणजी: गोव्याच्या माजी महसूल मंत्री आणि ताळगाव मतदारसंघाच्या विद्यमान भाजप आमदार जेनिफर मोन्सेरात यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांची कॅन्सरशी झुंज अपुरी पडली. त्यांच्या निधनाने गोव्याच्या राजकीय वर्तुळातून तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे. त्या ५१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात मुलगे दोन रोहित आणि अमित, सूना, नातवंडे असा परिवार परिवार आहे.
राजकीय कारकीर्दीची सुरुवात आणि पहिले यश
जेनिफर मोन्सेरात यांनी २००७ मध्ये युनायटेड गोअन्स डेमोक्रॅटिक पार्टी (UGDP) कडून सेंट क्रुझ मतदारसंघातून पहिली विधानसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांना अपयश आले. त्यानंतर २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर उत्तर गोव्यातील ताळगाव मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या. २०१७ च्या निवडणुकीतही ताळगावच्या जनतेने त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला. विधानसभा निवडणुकीत सलग दोनदा विजयी होणाऱ्या गोव्याच्या पहिल्या महिला आमदार ठरण्याचा बहुमान त्यांनी मिळवला.
भाजप प्रवेश आणि महत्त्वाचे मंत्रिपद
जुलै २०१९ मध्ये गोव्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या. जेनिफर मोन्सेरात यांनी आपले पती बाबूश मोन्सेरात यांच्यासह अन्य काँग्रेस आमदारांसोबत भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला. तत्कालीन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळात त्यांची कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्ती झाली. गोव्याच्या विधानसभा इतिहासात कॅबिनेट मंत्री बनणाऱ्या त्या पहिल्या महिला आमदार ठरल्या. या काळात त्यांनी महसूल (Revenue), माहिती तंत्रज्ञान (IT), कामगार (Labour) आणि रोजगार (Employment) यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या खात्यांचा कारभार सांभाळला.
सामाजिक क्षेत्रातील योगदान
राजकीय पदांशिवाय जेनिफर मोन्सेरात यांनी मार्च २०१३ पासून 'गोवा राज्य महिला आयोग' (Goa State Commission for Women) च्या समिती सदस्या म्हणून सलग तीन वर्षे काम पाहिले होते. ताळगाव मतदारसंघातील विकासकामांवर आणि महिलांच्या सक्षमीकरणावर त्यांनी विशेष भर दिला होता. सलग तीन वेळा आमदार म्हणून मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जेनिफर मोन्सेरात यांच्या निधनाने गोव्याने लोकाभिमुख महिला नेतृत्व गमावले आहे.