Home >> गोवा >> साप्ताहिकी - या आठवड्यात घडलेल्या ठळक घडामोडी

साप्ताहिकी - या आठवड्यात घडलेल्या ठळक घडामोडी

दीर्घ विश्रांतीनंतर पावसाचा तडाखा; मडगाव, रिवण बाजारात आगीने दुकाने भस्मसात

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
18th July, 09:15 pm
साप्ताहिकी - या आठवड्यात घडलेल्या ठळक घडामोडी

पणजी : दीर्घ विश्रांतीनंतर पावसाने झोडपण्यास सुरुवात केली असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. केळशी-कुठ्ठाळीच्या ग्रामसभेत तरंगत्या रिसॉर्टला ग्रामस्थांनी विरोध केला. मडगावात कपड्यांच्या शो रूमला आग लागून लाखोंचे नुकसान झाले. याशिवाय फसवणूक, चोरीच्या घटना घडल्या आहेत. या आठवड्यातील घडामोडींचा घेतलेला आढावा.

रविवार

तरंगत्या रिसॉर्ट प्रकल्पाला केळशी ग्रामसभेत विरोध

केळशी-कुठ्ठाळीच्या ग्रामसभेत मोवाज एंटरप्रायझेसच्या पर्यटन प्रकल्पाला एकमुखी विरोध करण्यात आला. या प्रकल्पाला तात्पुरता ‘ना हरकत’ दाखला दिला आहे, त्याला कायदेशीर आव्हान देण्याचा तसेच गरज पडल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा ठराव घेण्यात आला. याप्रसंगी उपस्थित कुठ्ठाळीचे आमदार आंतोनियो वाझ यांनीही लहान गावात असले प्रकल्प नकोच असल्याचे स्पष्ट केले.

मडगावात कपड्यांच्या शो रूमला आग

मडगाव येथील न्यू मार्केटनजीक असलेल्या ‘मान्यवर’ या कपड्यांच्या शो रूमला आग लागली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले असून ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, अशी शक्यता अग्निशामक दलाने वर्तवली आहे. आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

नावेलीतील महिलेची ३.३८ लाखांची फसवणूक

इन्स्टाग्रामवर ओळख वाढवून, प्रेमसंबंधांचे नाटक करत एका अज्ञात भामट्याने नावेली येथील एका महिलेला तब्बल ३ लाख ३८ हजार रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी मडगाव पोलिसांनी अज्ञात संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सोमवार

दुचाकीने ठोकरल्याने अर्धफोंड येथील महिलेचा मृत्यू

एका अल्पवयीन मुलाने दुचाकीने ठोकर दिल्याने अर्धफोंड पासल भाटपाळ येथील चंद्रकला चंद्रकांत नाईक या ७३ वर्षे वयाच्या वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

रिवण बाजारात भीषण आग; सहा दुकाने भस्मसात

सांगे मतदारसंघातील रिवण बाजारात सोमवारी सकाळी साडेआठ वाजता शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत दोन किराणा दुकाने, दोन हॉटेल्स, एक दारूचे दुकान आणि एका विमा कंपनीच्या कार्यालयासह एकूण सहा दुकाने जळून खाक झाली आहेत. कुडचडे अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली.

मोफत क्रेडिट कार्डचे आमिष दाखवून ऑनलाइन फसवणूक

मोफत क्रेडिट कार्ड देण्याचे आमिष दाखवून व्हॉट्सप लिंकद्वारे एपीके फाईल डाऊनलोड करण्यास भाग पाडले. त्यानंतर सायबर चोराने क्लिम फर्नांडिस (रा. अवडे-पाद्रीभाट, केपे) यांची २.२६ लाखांची ऑनलाइन फसवणूक केली. याप्रकरणी मडगाव पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

मंगळवार

पोलीस अधिकार्‍याच्या घरात चोरीचा प्रयत्न; दोघांना अटक

बार्देश तालुक्यातील वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याच्या घरात चोरीचा प्रयत्न करणार्‍या दोघा संशयितांना साळगाव पोलिसांनी प्रतिबंधात्मक अटक केली. तोर्डा येथील हायलँडस् व्हिला संकुलातील चोरी प्रकरणी दोघा संशयितांना पर्वरी पोलिसांनी ताब्यात घेतले.

डिचोलीतील आयटीआय विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी दोघांना अटक

डिचोली तालुक्यातील एका घरात विजेचे काम करत असताना व‌िजेचा धक्का लागून आयटीआयचा विद्यार्थी अक्षत राजेश नाईक (२०) याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी डिचोली पोलिसांनी वीज खात्याचा लाईनमन केदार मांद्रेकर आणि घरमालक समीर मावळींगकर यांना अटक केली आहे.

ड्रग्ज तस्कर अटालाचा जामीन उच्च न्यायालयाकडून रद्द

सराईत ड्रग्ज तस्कर यानिव्ह बेनाहिम उर्फ अटाला या इस्रायली नागरिकाला मेरशी येथील सत्र न्यायालयाने मंजूर केलेला सशर्त जामीन गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. या जामिनावर नव्याने सुनावणी घेऊन एका महिन्याच्या आत निर्णय देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले असून, तोपर्यंत संशयित जामिनावर असल्याने त्याला अटक करण्याची आवश्यकता नसल्याचेही स्पष्ट केले आहे.

बुधवार

राज्यातील २६ जागांवर आयटीएमएस यंत्रणा कार्यान्वित

राज्यातील २६ जागांवर इंटेलिजेंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टम (आयटीएमएस) प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. याआधी ही प्रणाली १ जुलैपासून सुरू करण्यात येणार होती. मात्र काही कारणास्तव याची तारीख पुढे ढकलून १५ जुलै करण्यात आली होती.

कळंगुटमध्ये पर्यटन खात्याच्या कर्मचाऱ्याला मारहाण

उमतावाडा, कळंगुट येथे कुत्र्यावर फेकलेला दगड चुकून रिसॉर्टच्या खिडकीच्या काचेवर लागला. या कारणास्तव पर्यटन खात्याच्या कर्मचाऱ्याला जबर मारहाण केल्याप्रकरणी हॉटेल ए कानोआ बीच रिसॉर्टच्या कर्मचाऱ्यांवर कळंगुट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दुचाकी चोरीप्रकरणी संशयिताला कोल्हापुरातून अटक

मडगाव येथील मडगाव रेल्वेस्थानक परिसरातून दुचाकी चोरी प्रकरणी मडगाव पोलिसांनी महाराष्ट्रातील कोल्हापूर येथून संशयिताला ताब्यात घेतले. संशयित अधीकुमार गिरमल (३६) याला अटक करण्यात आली असून चोरीची दुचाकीही जप्त करण्यात आली आहे.

गुरुवार

मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीकडून सुलेमान सिद्धीकीला अटक

बनावट कागदपत्राद्वारे बार्देश व इतर तालुक्यातील जमीन हडप प्रकरणी गोवा पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) संशयित सिद्धीकी उर्फ सुलेमान खान याच्यावर कारवाई केली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सिद्धीकीला अटक केली.

मोबाईल बँकिंग ॲपचा वापर करून अज्ञाताने लाटले ९८,५०० रुपये

माशे-काणकोण येथील डॉ. विलास पावसकर यांच्या बँक खात्यातून ९८ हजार ५०० रुपये बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून आर्थिक फसवणुकीचा प्रकार घडला आहे. डॉ. विलास पावसकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २४ फेब्रुवारी २०२६ रोजी एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या मोबाईल फोनचा ताबा मिळवून मोबाईल बँकिंग ॲपचा वापर केला. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून ९८ हजार ५०० रुपये बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून त्यांची आर्थिक फसवणूक केली.

शुक्रवार

डिजिटल अरेस्टप्रकरणी गोव्यासह मुंबई, कोलकातातील २० ठिकाणी छापे

सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) गोवा विभागाने डिजिटल अरेस्ट प्रकरणात गोव्यात दोन ठिकाणांसह दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे एकूण २० ठिकाणी छापे टाकले. या प्रकरणातील हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम दुबई व इतर आखाती देशांत पाठविल्याचे उघड झाले आहे. सुमारे दोन कोटी रुपयांची रोख रक्कम, विदेशी चलन, सोने, इलेक्ट्रॅानिक डिव्हाईसेस, मालमत्तेच्या कागदपत्रांसह इतर दस्तावेज जप्त करण्यात आले आहेत.

पावसामुळे सांगे, सत्तरीतील जनजीवन विस्कळीत

जुलैच्या सुरुवातीपासून विश्रांती घेतलेल्या मान्सूनने पुन्हा जोर धरला. सत्तरी आणि सांगे तालुक्यांत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. वेळूस नदीचे पाणी कुळागरांत शिरले. मुरमुणे–गुळेली येथे रस्ते पाण्याखाली गेले.

‘३९ अ’ १५ दिवसांत रद्द न केल्यास आंदोलन

निवृत्त न्यायाधीश फेर्द‌िन रिबेलो यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेतर्फे कलम ‘३९ अ’विरुद्ध आंदोलन सुरू आहे. पाटो-पणजी येथे नगरनियोजन कार्यालयाबाहेर ‘इनफ इज इनफ’तर्फे सभा घेण्यात आली. नगरनियोजन कायद्याचे कलम ‘३९ अ’ १५ दिवसांत रद्द न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

शनिवार

मोरजी येथे वकिलासह अशिलावर जीवघेणा हल्ला

हॉटेलचे अनधिकृत बांधकाम पाडण्याची प्रक्रिया करण्यासाठी मोरजी येथे गेलेले ॲडव्होकेट अंकुर कुमार आणि त्यांच्या अशिलावर ८ ते १० जणांच्या संतप्त गटाकडून लोखंडी सळ्या आणि दगडांनी जीवघेणा हल्ला केला. तीन आरोपींसह इतर आठ ते दहा अज्ञात व्यक्तींवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

लक्षवेधी

गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) पणजी येथील कदंब बस स्थानकाच्या एक्झिट पॉईंटजवळ, अटल सेतू पुलाखाली छापा टाकून झारखंड येथील भागीरथ कुमार सिंग (३१) आणि प्रशांत कुमार सिंग (२७) या दोघा युवकांना अटक केली. त्याच्याकडून १५ लाख रुपये किमतीचा १४.९५३ किलो गांजा जप्त केला.

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडून (एनएमसी) गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) एमबीबीएसच्या ५० अतिरिक्त जागांना अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे आगामी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून महाविद्यालयाची प्रवेशक्षमता २०० वरून २५० विद्यार्थ्यांपर्यंत वाढणार आहे.

सध्या सुरू असलेल्या कोरड्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर कृषी खात्याच्या विभागीय अधिकाऱ्यांनी राज्यातील भात शेतीची पाहणी केली असून, वेळसाव वगळता इतर कोणत्याही भागात भात पिकाचे नुकसान झाल्याचे आढळलेले नाही, अशी माहिती कृषी संचालक चंद्रहास देसाई यांनी दिली.

नोकरीचे आमिष दाखवून उत्तर प्रदेश मधील एका २३ वर्षीय युवतीवर बलात्कार केल्याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी बागा येथील एका स्पाचा भागीदार संशयित आरोपी अदवेश राय (रा. मूळ उत्तर प्रदेश) याला अटक केली आहे.

राज्य सरकारने कॅसिनोतील जुगारावर नियंत्रण आणण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेत २१ वर्षांखालील तरुणांना कॅसिनोच्या जुगार क्षेत्रात (डिझिग्नेटेड एरिया) प्रवेशबंदी लागू केली आहे. यासंदर्भातील अधिसूचना गृह खात्याने जारी केली असून, जुगार क्षेत्राची व्याख्याही नव्याने स्पष्ट करण्यात आली आहे. तसेच, कॅसिनो परवाना शुल्क उशिरा भरल्यास १८ टक्के दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. 

हेही वाचा
सर्व पहा