व्यापाऱ्यांकडून समाधान : अन्य समस्यांकडेही लक्ष देण्याची मागणी

वाळपई : येथील नगरपालिकेच्या मार्केट कॉम्प्लेक्समधील पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी असलेल्या लोखंडी पायऱ्या तुटल्याने ग्राहक व व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. या समस्येबाबत दै. ‘गोवन वार्ता’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर वाळपई नगरपालिकेने तातडीने दखल घेत संबंधित पायऱ्यांची दुरुस्ती केली. त्यामुळे ग्राहक व व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त करत नगरपालिकेचे प्रशासक राजीव देसाई व मुख्याधिकारी धीरेंद्र बाणावलीकर यांचे आभार मानले.
वाळपई शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले नगरपालिका मार्केट कॉम्प्लेक्स हे व्यापारीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. या इमारतीतील पहिल्या मजल्यावरील दुकानांमध्ये जाण्यासाठी लोखंडी जिन्याचा वापर केला जातो. काही दिवसांपूर्वी या जिन्याच्या पायऱ्या तुटल्या. अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन व्यापारी व ग्राहकांनी याबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती.
नगरपालिकेने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेत अल्पावधीत पूर्ण केले. त्यामुळे संभाव्य अपघाताचा धोका टळला असून नागरिकांनी नगरपालिकेच्या तत्परतेचे स्वागत केले आहे.
वाळपई नगरपालिकेचे प्रशासक राजू देसाई यांनी सांगितले की, नागरिकांकडून तक्रार प्राप्त झाली होती. यानंतर तातडीने संबंधित विभागाला सूचना देण्यात आल्या आणि पायऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून भविष्यात अशा प्रकारच्या समस्या उद्भवू नयेत यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
मार्केट कॉम्प्लेक्ससमोरील मोकळ्या जागेत अनियमित दुचाकी पार्किंग केली जात असल्याने ग्राहकांना दुकानांपर्यंत पोहोचणे कठीण होते. त्यामुळे या परिसरात शिस्तबद्ध पार्किंग व्यवस्था निर्माण करावी किंवा आवश्यक असल्यास काही भागात दुचाकी पार्किंगवर निर्बंध आणावेत, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे मार्केट कॉम्प्लेक्ससमोरील जागा मोकळी राहील व ग्राहकांना सहजपणे दुकानांमध्ये ये-जा करता येईल, असे त्यांचे मत आहे.
इतर समस्याही कायम
पायऱ्यांची दुरुस्ती झाली असली तरी मार्केट कॉम्प्लेक्समधील इतर अनेक समस्या अद्याप कायम असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. विशेषतः दुसऱ्या मजल्यावरील अनेक दुकाने रिकामी असून त्या ठिकाणी जाण्यासाठी ग्राहकांना अडचणी येतात. अनेकदा साफसफाईकडे दुर्लक्ष होत असल्याने परिसर अस्वच्छ दिसतो. परिणामी ग्राहक वरच्या मजल्यांवर जाणे टाळतात आणि त्याचा थेट परिणाम तेथील व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.