Home >> गोवा >> बेळगाव-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तिहेरी अपघात; मद्यधुंद कारचालकामुळे दुर्घटना

बेळगाव-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तिहेरी अपघात; मद्यधुंद कारचालकामुळे दुर्घटना

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
1 hours ago
बेळगाव-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तिहेरी अपघात; मद्यधुंद कारचालकामुळे दुर्घटना

रामनगर : बेळगाव-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रामनगरजवळील अस्तोली येथे शुक्रवारी तिहेरी अपघात घडला. गोव्यातून अनमोड मार्गे बेंगळुरूकडे जाणाऱ्या एका कारने प्रथम ट्रकला धडक दिली. त्यानंतर समोरून बेंगळुरूहून गोव्याकडे पर्यटनासाठी निघालेल्या दुसऱ्या कारला जोरदार धडक दिली.

या अपघातात दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले असले, तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व प्रवासी किरकोळ दुखापतींसह बचावले.

प्राथमिक माहितीनुसार, गोव्यातून बेंगळुरूकडे जाणाऱ्या केरळ नोंदणीच्या कारचा चालक पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत होता. अपघातग्रस्त कारमधून मद्याच्या बाटल्याही आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. मात्र, अपघाताचे ठिकाण लोंढा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने पुढील कारवाईसाठी लोंढा पोलिसांना माहिती देण्यात आली असून, त्यांनी पुढील तपास सुरू केला आहे.

हेही वाचा
सर्व पहा