हरियाणातील जिंद–सोनीपत मार्गावर हरित रेल्वे युगाची सुरुवात; पर्यावरणपूरक वाहतुकीकडे मोठे पाऊल

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या इतिहासात नवा अध्याय लिहित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. (PM Modi flags off India’s first hydrogen train on Jind-Sonipat route). हरियाणातील जिंद–सोनीपत या ८९ किलोमीटरच्या मार्गावर ही ट्रेन प्रायोगिक तत्त्वावर धावणार असून, पर्यावरणपूरक आणि शाश्वत वाहतुकीच्या दिशेने भारताने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.
ही अत्याधुनिक हायड्रोजन ट्रेन चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) मध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विकसित करण्यात आली आहे. भारतीय रेल्वेच्या हरित ऊर्जा धोरणाचा हा महत्त्वाचा भाग मानला जात , भविष्यात अशा तंत्रज्ञानाचा अधिक व्यापक वापर करण्याचा रेल्वेचा मानस आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, जिंद–सोनीपत मार्गाची हायड्रोजन ट्रेनच्या प्रायोगिक संचालनासाठी निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी जिंद येथे स्वदेशी हायड्रोजन साठवण आणि इंधन भरण्याची (Refuelling) अत्याधुनिक सुविधा उभारण्यात आली आहे. पेट्रोलियम अँड एक्स्प्लोसिव्ह्ज सेफ्टी ऑर्गनायझेशन (PESO) कडून संकुचित हायड्रोजन वायूच्या साठवण आणि वितरणासाठी आवश्यक परवानगीही मिळाली आहे.
हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या रेल्वेमधून कार्बन उत्सर्जन अत्यल्प होते. त्यामुळे पारंपरिक डिझेल इंजिनांच्या तुलनेत ही ट्रेन अधिक पर्यावरणपूरक असून, प्रदूषण कमी करण्यास आणि स्वच्छ ऊर्जा वापर वाढविण्यास मोठी मदत होणार आहे.
भारतीय रेल्वेने हरित ऊर्जा, स्वदेशी तंत्रज्ञान आणि आधुनिक पायाभूत सुविधा यांवर भर देत भविष्यात अशा अधिक हायड्रोजन रेल्वा सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. या उपक्रमामुळे भारताच्या 'ग्रीन मोबिलिटी' आणि 'नेट झिरो कार्बन' उद्दिष्टांना चालना मिळणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.