आपल्या आराध्य दैवताच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

पुरी : ओडिशातील पुरी येथे दरवर्षी होणारी श्री जगन्नाथ रथयात्रा ही भारतातील सर्वात प्राचीन, भव्य आणि श्रद्धेने ओतप्रोत भरलेली धार्मिक परंपरा मानली जाते. (the temple town of Puri in Odisha becomes the centre of one of the world’s oldest and largest religious gatherings as millions of devotees assemble for the Jagannath Rath Yatra) या सोहळ्यात भगवान श्रीजगन्नाथ, भगवान बलभद्र, देवी सुभद्रा आणि सुदर्शन चक्र भव्य लाकडी रथांमधून श्रीमंदिरातून गुंडीचा मंदिराकडे प्रस्थान करतात. सुमारे सात दिवसांच्या मुक्कामानंतर देवतांचा पुनरागमन सोहळा पार पडतो. आज गुरुवारी ही रथयात्रा आहे. त्यानिमित्त मंदिर परिसर भाविकांच्या अलोट गर्दीत फुलून गेला आहे. एकूण भावभक्तीने ओतप्रोत भरलेले भक्तीमय वातावरण पहायला मिळत आहे. भाविक आपल्या लाडक्या दैवताच्या दर्शनासाठी आतुरलेले दिसत आहेत.
दरवर्षी लाखो भाविक या रथयात्रेसाठी पुरीत दाखल होतात. देव स्वतः मंदिराबाहेर येऊन भक्तांना दर्शन देतात, अशी श्रद्धा असल्याने ही यात्रा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र उत्सवांपैकी एक मानली जाते.
दरवर्षी नव्याने उभारले जातात रथ
रथयात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी नव्याने तयार होणारे तीन भव्य लाकडी रथ. पारंपरिक कारागिरांकडून विशिष्ट प्रकारच्या लाकडाचा वापर करून हे रथ तयार केले जातात. या कामाची सुरुवात अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर होते.
श्रीजगन्नाथांचा ‘नंदीघोष’ – १६ चाके, सुमारे ४५ फूट उंच.
बलभद्रांचा ‘तलध्वज’ – १४ चाके.
देवी सुभद्रेचा ‘दर्पदलन’ – १२ चाके.
प्रत्येक रथाला वेगवेगळे रंग, घोडे, सारथी आणि पारंपरिक अलंकारांनी सजवले जाते.
स्नान यात्रेपासून रथयात्रेपर्यंत धार्मिक विधी
रथयात्रेपूर्वी स्नानयात्रा विधीत देवतांना १०८ कलशांतील पवित्र जलाने अभिषेक केला जातो. त्यानंतर देवता आजारी असल्याची धार्मिक मान्यता असून त्या सुमारे पंधरा दिवस भक्तांच्या दर्शनासाठी उपलब्ध नसतात. या कालावधीला ‘अनसर’ असे म्हटले जाते. त्यानंतर नवयौवन दर्शन आणि नेत्रोत्सव विधी पार पडतात. देवतांना नव्याने रंगरंगोटी करून डोळ्यांचे पूजन केले जाते आणि त्यानंतरच त्या रथयात्रेसाठी सज्ज होतात.
राजाचा नम्रतेचा संदेश
रथयात्रेच्या दिवशी ‘पहांडी’ विधीद्वारे देवतांना मंदिराबाहेर आणले जाते. त्यानंतर पुरीचे गजपती महाराज सुवर्ण झाडूने रथांची साफसफाई करण्याचा ‘छेरा पहंरा’ हा विधी करतात. हा सोहळा ईश्वरासमोर सर्वजण समान असल्याचा संदेश देतो.
यानंतर हजारो भाविक जाड दोरांच्या सहाय्याने रथ ओढतात. रथाच्या दोरीला स्पर्श करणे किंवा रथ ओढण्याची संधी मिळणे हे अत्यंत पुण्यदायी मानले जाते.
श्रद्धा, समता आणि संस्कृतीचा अद्वितीय उत्सव
श्री जगन्नाथ रथयात्रा हा केवळ धार्मिक सोहळा नसून श्रद्धा, समता, लोकपरंपरा, कला आणि सांस्कृतिक वारशाचे जीवंत प्रतीक आहे. आदिवासी परंपरा, लोकसंस्कृती आणि वैदिक धार्मिक विधी यांचा सुंदर संगम या उत्सवात पाहायला मिळतो.
दरवर्षी पुरीच्या बडदांडावरून मार्गक्रमण करणारे हे भव्य रथ भगवान आणि भक्त यांच्यातील अतूट नात्याचे प्रतीक मानले जातात. शतकानुशतके अखंड सुरू असलेली ही परंपरा आजही भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभवाची साक्ष देत आहे.