Home >> गोवा >> ‘इनफ इज इनफ’तर्फे उद्या सभा

‘इनफ इज इनफ’तर्फे उद्या सभा

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
37 mins ago
‘इनफ इज इनफ’तर्फे उद्या सभा

पणजी :  ‘इनफ इज इनफ’तर्फे उद्या (१७ जुलै) पणजीतील नगरनियोजन खात्याच्या कार्यालयासमोर सभा घेण्यात येणार आहे. नगरनियोजन कायद्यातील कलम ३९ अ रद्द करणे, यानुसार झालेल्या जमिनीचे रूपांतरण रद्द करणे व अन्य मागण्यांसाठी उपस्थिती लोकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन त्या मुख्य नगरनियोजकांना देण्यात येणार असल्याचे देविदास आमोणकर यांनी सांगितले. गुरुवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी गोविंद शिरोडकर उपस्थित होते. 

आमोणकर यांनी सांगितले की, उद्या होणारी सभा शांततेत आणि सर्व कायद्यांचे पालन करून घेतली जाणार आहे. सभा सकाळी १० वाजता सुरू होईल. यावेळी क्लाऊड आल्वरिस व इनफ इज इनफचे पदाधिकारी आपली भूमिका मांडतील. त्यानंतर आमचे शिष्टमंडळ मुख्य नगर नियोजकांना भेटून आपले निवेदन सादर करणार आहेत. यानंतर क्लाऊड आल्वरिस माध्यमांना संबोधित करतील. उद्याच्या सभेसाठी आम्ही भाजपसह सर्व पक्षाच्या नेत्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. 

ते म्हणाले, आमचा विकासाला विरोध नाही. मात्र विकास शाश्वत असला पाहिजे. विकासाच्या नावे राज्यातील जमिनींचे रूपांतरण करणे योग्य नाही. 

३९ अ मुळे राज्यातील पर्यावरणाचा नाश होत आहे.  गोव्याला येथील अस्मितेला वाचवायचे असेल तर ३९ अ कलम रद्द झालेच पाहिजे. याबाबत आम्ही आधीही राज्य सरकार, मुख्यमंत्री, पंतप्रधानांना निवेदन दिले आहे. आम्हाला हा लढा शांततापूर्ण पद्धतीने लढायचा आहे. मात्र सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे. सरकारने आम्हाला कायदा हातात घेण्यास प्रवृत्त करू नये.

गोविंद शिरोडकर म्हणाले की, आमच्या चळवळीला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील सहा महिन्यात आम्ही सर्व तालुक्यात चिंतन बैठका घेतल्या आहेत. गोव्याचे अस्तित्व संपवणारे कलम ३९ अ रद्द झालेच पाहिजे. सरकारने याबाबत सोंग घेतले आहे. सरकारला जागे करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. आपली एकी दाखवली तरच सरकारला भान येईल. उद्या होणाऱ्या सभेला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. 

हेही वाचा
सर्व पहा