डॉक्टर पत्नी पोलिसांच्या ताब्यात

धारवाड : कर्नाटकातील धारवाड येथे एका डॉक्टरची त्यांच्या राहत्या घरात निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हल्ल्यात त्यांचा आठ वर्षांचा मुलगाही गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी डॉक्टरांच्या डॉक्टर पत्नीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. (Karnataka Doctor Murdered, 8-Year-Old Son Stabbed At Home, Wife in Custody).
मृत डॉक्टरांची ओळख डॉ. किरण होन्नावर (वय ४५) अशी असून ते चिरायु रुग्णालयात भूलतज्ज्ञ (Anesthesiologist) म्हणून कार्यरत होते. त्यांची पत्नी डॉ. प्रियांका या नेत्रतज्ज्ञ (Ophthalmologist) आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना अत्यंत सुरक्षित निवासी संकुलातील फ्लॅटमध्ये घडली. प्राथमिक तपासात कोणत्याही बाहेरील व्यक्तीने घरात प्रवेश केल्याचे पुरावे आढळले नाहीत. घटनेच्या वेळी घरात फक्त पती, पत्नी आणि त्यांचा मुलगा उपस्थित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
डॉ. किरण यांच्याशी दिवसभर संपर्क होत नसल्याने नातेवाईकांनी वारंवार फोन केला. त्यावेळी पत्नीने ते विश्रांती घेत असल्याचे आणि नंतर बाहेर गेल्याचे सांगितले. मात्र संध्याकाळपर्यंतही संपर्क न झाल्याने नातेवाईकांनी फ्लॅटमध्ये जाऊन पाहिले असता, डॉ. किरण रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळले. दुसऱ्या खोलीत त्यांचा आठ वर्षांचा मुलगा चाकूच्या वारांनी गंभीर जखमी अवस्थेत आढळला.
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मुलाला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती चिंताजनक असली तरी त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
हुबळी-धारवाड पोलीस आयुक्त एन. शशिकुमार यांनी सांगितले की, घटनास्थळावरील परिस्थिती आणि प्राथमिक तपासाच्या आधारे अनेक बाबींची चौकशी सुरू आहे. नेमका घटनाक्रम आणि हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.