अभिनेत्रीचा डीपफेक व्हिडिओ आणि ३३ लाखांचा गंडा

छत्रपती संभाजीनगर: आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) गैरवापर करून सायबर गुन्हेगार आता सामान्य लोकांना लक्ष्य करत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. फेसबुकवरील एका बनावट 'एआय' जाहिरातीला बळी पडून शहरातील ७१ वर्षीय ज्येष्ठ समाजसेविकेला सायबर गुन्हेगारांनी तब्बल ३३ लाख ६३ हजार ५४२ रुपयांना ऑनलाइन गंडा घातला आहे. याप्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार वृद्ध महिला १२ मार्च रोजी फेसबुक वापरत असताना त्यांना प्रसिद्ध अभिनेत्री सुधा चंद्रन यांचा एक व्हिडिओ दिसला. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री ज्येष्ठांना मोठ्या परताव्यासाठी आणि आर्थिक स्वातंत्र्यासाठी एका विशिष्ट ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक करण्याचे आवाहन करत होती. प्रत्यक्षात हा व्हिडिओ 'डीपफेक' तंत्रज्ञानाचा वापर करून हुबेहूब तयार करण्यात आला होता. या जाहिरातीला प्रतिसाद देताच महिलेला आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून कॉल आले. सुरुवातीला त्यांनी गृह कर्ज नाकारले, मात्र कॉलरने ज्येष्ठ नागरिक गुंतवणूक योजनेचे आमिष दाखवून त्यांना जाळ्यात ओढले. त्यानंतर अवनी गुप्ता नावाच्या एका कथित वित्तीय सल्लागाराने व्हॉट्सॲपवर यूके-आधारित क्रमांकावरून संपर्क साधला.
गुप्ता आणि तिच्या सहकाऱ्यांनी वृद्धेला 'क्वांटा इनोव्हेक्स' (क्वांटाईन सीएफडी ट्रेडिंग) या फर्ममध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. फसवणुकीची ही पद्धत अत्यंत नियोजनबद्ध होती. गुंतवणूक प्रक्रिया सुरू असताना गुन्हेगारांनी वृद्धेला एका आभासी ट्रेडिंग पोर्टलचा डॅशबोर्ड दाखवला. या बनावट डॅशबोर्डवर वृद्धेच्या खात्यात ८,२००,४४० अमेरिकन डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे ६८ कोटी रुपयांचा नफा जमा झाल्याचे भासविण्यात आले. हा प्रचंड नफा पाहून वृद्धेचा विश्वास अधिक दृढ झाला. मात्र, हा नफा बँक खात्यात वळता करण्यासाठी सायबर भामट्यांनी एक जाचक अट घातली. हा निधी काढण्यापूर्वी 'यूके सरकारचा कर' म्हणून २,०००,००० ब्रिटिश पाउंड म्हणजेच २१ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करावी लागेल, असे त्यांना सांगण्यात आले.
या मोठ्या रकमेची मागणी झाल्यानंतर वृद्धेला संशय आला, परंतु आधीच गुंतवलेले पैसे आणि दिसणारा मोठा नफा यामुळे त्यांनी आरोपींच्या सूचनेनुसार पैसे पाठवण्यास सुरुवात केली. सायबर गुन्हेगारांनी अत्यंत हुशारीने ४७ दिवसांच्या कालावधीत एकूण सहा वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे वृद्धेकडून ३३ लाख ६३ हजार ५४२ रुपये उकळले. यामध्ये १३ एप्रिल रोजी २१ हजार, २२ एप्रिल रोजी आरटीजीएसद्वारे ३ लाख, ८ मे रोजी २ लाख ३३ हजार, १२ मे रोजी ६ लाख ५० हजार, १४ मे रोजी १० लाख ५९ हजार आणि २९ मे रोजी सर्वाधिक ११ लाख रुपयांचा व्यवहार करण्यात आला. हे पैसे वेगवेगळ्या पाच बँक खात्यांमध्ये आणि एका यूपीआय आयडीवर वर्ग करण्यात आले.
संशय येऊनही नफ्याच्या आशेने वृद्धेने २९ मे रोजी ११ लाख रुपये पाठवले. अशा प्रकारे तब्बल ४७ दिवसांच्या कालावधीत आरटीजीएस आणि यूपीआयच्या माध्यमातून वेगवेगळ्या ६ व्यवहारांद्वारे सायबर चोरांनी ३३ लाख ६३ हजार ५४२ रुपये लुटले. पैसे भरूनही नफा मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे वृद्धेच्या लक्षात आले. सायबर पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार हा व्हिडिओ एआय टूल्सच्या सहाय्याने मॉर्फ करण्यात आला होता. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.