Home >> देश -परदेश >> आई, मुलगा पाकिस्तानी; वडील, तीन मुले भारतीय!

आई, मुलगा पाकिस्तानी; वडील, तीन मुले भारतीय!

दोघांना अटक; कर्नाटकातील 'मिश्र नागरिकत्व' प्रकरण चर्चेत

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
40 mins ago
आई, मुलगा पाकिस्तानी; वडील, तीन मुले भारतीय!

चिक्कबळ्ळापूर : कर्नाटकातील चिक्कबळ्ळापूर जिल्ह्यात एका कुटुंबातील आई आणि एक मुलगा पाकिस्तानी नागरिक, तर वडील आणि उर्वरित तीन मुले भारतीय नागरिक असल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. राष्ट्रीयत्वाची माहिती लपवून रेशन कार्ड आणि मतदार ओळखपत्र मिळवल्याप्रकरणी पाकिस्तानी नागरिक असलेल्या फराह नाझ आणि तिचा मुलगा मोहम्मद फर्दीन यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बागेपल्ली येथील रहिवासी मोहम्मद अयुब खान हे भारतीय नागरिक असून ते संयुक्त अरब अमिरातीत (यूएई) नोकरी करत असताना त्यांचा विवाह पाकिस्तानी नागरिक फराह नाझ हिच्याशी झाला होता. या दाम्पत्याला चार मुले असून त्यापैकी मोहम्मद फर्दीनचा जन्म पाकिस्तानात झाल्याने तोही पाकिस्तानी नागरिक आहे. उर्वरित तीन मुले भारतीय नागरिक आहेत. सध्या हे कुटुंब बागेपल्ली येथे वास्तव्यास आहे.

चिक्कबळ्ळापूरचे पोलीस अधीक्षक कुशल चौकसे यांनी सांगितले की, फराह नाझ आणि तिच्या मुलाने राष्ट्रीयत्वाची वस्तुस्थिती लपवून रेशन कार्ड आणि मतदार ओळखपत्र मिळवल्याची विश्वसनीय माहिती मिळाल्यानंतर चौकशी सुरू करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नोंदींची पडताळणी करून राष्ट्रीयत्वाबाबतची महत्त्वाची माहिती लपविल्याचे आढळल्याने संबंधित रेशन कार्ड रद्द केले. तसेच सक्षम प्राधिकरणाने त्यांचे मतदार ओळखपत्रही रद्द केले.

बागेपल्लीच्या तहसीलदारांनी दिलेल्या तक्रारीवरून फराह नाझ आणि मोहम्मद फर्दीन यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), परदेशी नागरिक कायदा (Foreigners Act) तसेच लोकप्रतिनिधित्व कायद्यान्वये (Representation of the People Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनाही अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा
सर्व पहा