वृद्ध आणि दिव्यांग मुलाच्या खात्यांत मिळून ₹१,५०० कोटी

मुजफ्फरपूर : निवृत्तीवेतन (पेन्शन) काढण्यासाठी गेलेल्या ८२ वर्षीय वृद्धाला आपल्या बँक खात्यात तब्बल ₹७५९.६९ कोटींची शिल्लक दिसल्याने एकच खळबळ उडाली. (Bihar Man Goes To Withdraw Cash From Bank, Finds Rs 759 Crore In Account ). ही धक्कादायक घटना बिहारमधील मुजफ्फरपूर जिल्ह्यात घडली असून, प्राथमिक माहितीनुसार हा प्रकार बँकिंग प्रणालीतील तांत्रिक बिघाडामुळे घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
कवी तसेच सामाजिक सुरक्षा पेन्शन योजनेचे लाभार्थी असलेले कामेश्वर मिश्रा रविवारी कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) येथे मासिक पेन्शन काढण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत दिव्यांग पेन्शन घेणारा त्यांचा मुलगाही होता.
पितापुत्राच्या खात्यात मिळून दीड हजार कोटी
पेन्शनची रक्कम काढल्यानंतर मिश्रा यांनी आपल्या खात्यातील शिल्लक तपासली. त्यावेळी खात्यात ₹७५९,६९,५१,९५१ (सुमारे ₹७५९ कोटी) इतकी रक्कम असल्याचे दिसून आले. त्यानंतर मुलाच्या खात्याची शिल्लक तपासली असता, त्यातही अशाच प्रकारे प्रचंड रक्कम दिसली. दोन्ही खात्यांतील मिळून शिल्लक ₹१,५०० कोटींपेक्षा अधिक असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
रक्कम पाहून मिश्रा यांना धक्का
या अनपेक्षित प्रकारामुळे कामेश्वर मिश्रा यांना मोठा धक्का बसला. एवढी प्रचंड रक्कम खात्यात कशी आली, याची कोणतीही कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून खात्यांतील शिल्लक तपासावी आणि चूक असल्यास ती तातडीने दुरुस्त करावी, अशी मागणी त्यांनी संबंधित बँक आणि प्रशासनाकडे केली आहे.
दरम्यान, या घटनेबाबत संबंधित बँकेकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मात्र, बँकिंग प्रणालीतील तांत्रिक त्रुटी किंवा सॉफ्टवेअरमधील बिघाडामुळे ही शिल्लक दिसत असल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. अधिकृत प्रतिसादाची प्रतीक्षा आहे.