कुळ कायद्याचा भंग झाल्यास जमिनी ताब्यात घेणार : बावनकुळे

मुंबई/पणजी : गोवा–महाराष्ट्र सीमेवरील (Goa-Maharashtra border) मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळालगत (Mopa International Airport) महाराष्ट्राच्या हद्दीतील गेल्या तीन वर्षांतील जमीन व्यवहारांची सखोल चौकशी करण्याचे आदेश महसूल विभागाने दिले आहेत. कुळ कायद्याचे उल्लंघन करून शेतकरी नसलेल्या व्यक्तींनी कृषी जमीन खरेदी केल्याचे आढळल्यास संबंधित जमिनी सरकार ताब्यात घेणार, अशी माहिती महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात दिली.
बावनकुळे म्हणाले की, मोपा विमानतळाच्या परिसरात परप्रांतीय बिल्डरांनी मोठ्या प्रमाणावर जमिनी खरेदी केल्याची माहिती सरकारच्या निदर्शनास आली आहे. महाराष्ट्रातील कूळ कायद्यानुसार केवळ शेतकरीच कृषी जमीन खरेदी करू शकतो. त्यामुळे गेल्या तीन वर्षांतील सर्व जमीन व्यवहारांची सखोल चौकशी करण्याचे आदेश कोकण विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहेत.
मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यानंतर परिसरातील जमिनींचे दर झपाट्याने वाढले आहेत. मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदारांनी जमीन खरेदी केल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक व्यवहारांबाबत संशय व्यक्त केला जात होता. विशेषतः शेतकरी नसलेल्या व्यक्तींनी कुळ कायद्याचे उल्लंघन करून जमिनी खरेदी केल्याच्या तक्रारी सरकारकडे पोहोचल्या होत्या. त्यानंतर महसूल विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले.
तीन महिन्यांत अहवाल
या चौकशीसाठी कोकण विभागातील दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांचा समितीत समावेश करण्यात आला आहे. संबंधित व्यक्तींची नावे आणि व्यवहारांचा तपशील असलेला कृती अहवाल (एटीआर) तीन महिन्यांत सादर केला जाणार आहे. नंतर तो विधानसभेतही सादर होईल. चौकशीत कुळ कायद्याचे उल्लंघन करून जमीन खरेदी झाल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित जमिनी सरकार ताब्यात घेईल असा इशाराही बावनकुळे यांनी दिला.
नियमभंग सिद्ध झाल्यास कठोर कारवाई
चौकशीत कुळ कायद्याचे उल्लंघन झाल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित जमिनी सरकार ताब्यात घेईल, असा इशारा महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिला. या कारवाईमुळे मोपा विमानतळ परिसरातील कथित बेकायदेशीर जमीन व्यवहार उघडकीस येण्याची शक्यता असून, भविष्यात अशा व्यवहारांना आळा बसण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.