Home >> देश -परदेश >> सर्वोच्च न्यायालयात याचिकाकर्त्याचा गोंधळ, न्यायाधीशांनाच दिला आदेश!

सर्वोच्च न्यायालयात याचिकाकर्त्याचा गोंधळ, न्यायाधीशांनाच दिला आदेश!

याचिकाकर्ता प्रबल प्रताप सिंह पोलिसांच्या ताब्यात

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
50 mins ago
सर्वोच्च न्यायालयात याचिकाकर्त्याचा गोंधळ, न्यायाधीशांनाच दिला आदेश!

सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी एका याचिकाकर्त्याने जोरदार गोंधळ घातला असून, या घटनेमुळे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशही हतप्रभ झाले. न्यायमूर्ती केव्ही विश्वनाथन आणि न्यायमूर्ती आलोक अराधे यांच्या खंडपीठासमोर सकाळी ११ वाजता सुनावणी सुरू असताना हा प्रकार घडला असून, नंतर या याचिकाकर्त्याला कोर्टाबाहेर काढण्यात आले.

न्यायालयीन कामकाजाच्या वेळी आत जाऊन आरोपी याचिकाकर्त्याने थेट न्यायाधीशांना आदेश देण्याच्या थाटात बोलण्यास सुरुवात केली. "मिस्टर ज्युडिशियल सर्व्हंट, मी तुम्हाला आदेश देतो की लखनऊमध्ये सायबर क्राईमचे सिंडिकेट चालवणाऱ्या एका एएसपीविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचा आदेश द्या," असे त्याने कोर्टात म्हटले. यावर, "तू आम्हाला आदेश देत आहेस का?" असा सवाल न्यायमूर्ती केव्ही विश्वनाथन यांनी केला.

यानंतर याचिकाकर्त्याने न्यायालयात मोठा आरडाओरडा करण्यास सुरुवात केली आणि तो कागदपत्रे हवेत उडवू लागला. यामुळे तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्याला ओढत बाहेर काढले. स्वतःची बाजू स्वतः मांडणारा (पार्टी इन पर्सन) म्हणून हजर झालेल्या आणि स्वतःला ‘सॉवरेन’ म्हणवून घेणाऱ्या या याचिकाकर्त्याने कोर्टरूममध्ये कागदपत्रे उडवली, असे सांगितले जात आहे.

आरोपी पोलिसांच्या ताब्यात

या गोंधळानंतर त्याला कोर्टरूममधून बाहेर नेण्यात आले आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. सध्या दिल्ली पोलीस त्याची चौकशी करत असून ही घटना सकाळी सुमारे ११ वाजता आंशिक कामकाजाच्या (अर्धवेळ) दिवशी घडली, असे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा
सर्व पहा