मडगाव : मडगावात सुरू होणाऱ्या कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ESIC) इस्पितळात आता मेडिकल कॉलेजही सुरू होणार आहे. त्यामुळे दक्षिण गोव्यातील वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार आहे.
या मेडिकल कॉलेजसाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. विविध वैद्यकीय विषयांतील शिक्षकांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया या माध्यमातून सुरू होणार आहे.
ईएसआयसी इस्पितळाशी संलग्न मेडिकल कॉलेज सुरू झाल्यानंतर वैद्यकीय शिक्षणाच्या संधी वाढण्यासोबतच दक्षिण गोव्यातील आरोग्यसेवेलाही त्याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. या महाविद्यालयामुळे वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण, प्रशिक्षण आणि उपचाराच्या सुविधा अधिक बळकट होणार आहेत.
अधिक माहितीसाठी ईएसआयसीच्या वेबसाईटला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


