पणजी : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी, मराठी राजभाषा निर्धार समितीच्या वतीने आगामी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. मराठीला राजभाषेचा दर्जा मिळवून देण्याची ही सरकारसाठी अखेरची संधी असून, तसे न झाल्यास सरकारला राजकीय परिणामांना सामोरे जावे लागेल, असा सज्जड इशारा समितीचे नेते सुभाष वेलिंगकार यांनी दिला आहे.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सुमारे पाच हजार मराठीप्रेमी पणजी कदंब बस स्थानकावरून विधानसभेवर मोर्चा नेणार आहेत. या मोर्चादरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त असेल, त्यानुसार आमची रणनीती ठरली असल्याचे वेलिंगकरांनी स्पष्ट केले.
गो. रा. ढवळीकर यांनी सांगितले की, मराठीला गोव्याची राजभाषा करण्यासाठी राष्ट्रपतींकडे निवेदन सादर केले जाणार असून, त्याकरिता सध्या राज्यभरात स्वाक्षरी मोहीम हाती घेण्यात आली आहे. आतापर्यंत अडीच लाख स्वाक्षऱ्या गोळा करण्यात आल्या असून, तीन लाख स्वाक्षऱ्यांचे आपले ध्येय आहे.
गोव्यातील ८० टक्के बहुजन समाज मराठी बोलतो. कोकणी बोलली जात असली, तरी वाचताना किंवा लिहिताना अधिकृत वापर मराठीचाच होतो. शाळा, मते, देवळे, ग्रामपंचायती आणि वृत्तपत्रांमध्येही मराठीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो, असा युक्तिवाद ढवळीकरांनी केला.
पणजीत आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेस मराठी चळवळीचे वरिष्ठ नेते गो. रा. ढवळीकर, दिवाकर शिंक्रे, अशोक नाईक, गोविंद देव, डॉ. अनिता तिळवे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.


