पणजी : भारतीय प्रादेशिक हिप-हॉप क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या एका ऐतिहासिक घडामोडीत गोमंतकीय कोकणी रॅपर, गीतकार आणि कलाकार अमित जयवंत नाईक, अर्थात ‘वॉकिंग ग्रंट’, यांची ग्रॅमी पुरस्कार प्रदान करणाऱ्या ‘द रेकॉर्डिंग अकादमी’च्या मतदान सदस्यपदी निवड झाली आहे.
‘द रेकॉर्डिंग अकादमी’ ही जगभरातील संगीत निर्माते आणि व्यावसायिकांची प्रतिष्ठित संस्था म्हणून ओळखली जाते. तिच्याच माध्यमातून जगातील सर्वात मानाच्या ग्रॅमी पुरस्कारांचे आयोजन केले जाते. मतदान सदस्य म्हणून वॉकिंग ग्रंट यांना विविध संगीत प्रकारांतील कलाकृतींचे परीक्षण करण्यास, ग्रॅमी नामांकनासाठी कलाकृतींची निवड करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होण्यास तसेच विजेत्यांच्या निवडीत मतदान करण्याचा अधिकार मिळणार आहे.
गोमंतकीय संस्कृतीला आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान
या निवडीमुळे कोकणी संगीत, प्रादेशिक भारतीय कलाप्रकार, स्वतंत्र हिप-हॉप आणि गोमंतकीय संस्कृतीला आंतरराष्ट्रीय संगीत क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यासपीठावर स्थान मिळाले आहे. वॉकिंग ग्रंट हे ग्रॅमी पुरस्कारासाठी मतदान सदस्य म्हणून निवडले जाणारे पहिले कोकणी रॅप कलाकार ठरले आहेत.
आपल्या या यशाचे श्रेय वॉकिंग ग्रंट यांनी गोमंतकीय चित्रपट निर्माते आणि हॉलिवूडस्थित दिग्दर्शक मिलरॉय गोएस यांच्या र्गदर्शनाला दिले आहे. तसेच आपल्या संगीत निर्मात्यांसह हितचिंतकांचेही त्यांनी आभार मानले आहेत.
वॉकिंग ग्रंट यांच्या या निवडीमुळे गोव्याच्या कोकणी संगीत क्षेत्रासह भारतीय स्वतंत्र हिप-हॉपसाठीही नवी आंतरराष्ट्रीय दारे खुली झाली आहेत.


