कोल्हापूर : चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्याच पत्नीची भररस्त्यात कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना पेठवडगाव परिसरात घडली आहे. अमृता दीपक कांबळे (वय ३०) असे मृत महिलेचे नाव असून, याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी पती दीपक कांबळे (वय ३५) याला तात्काळ अटक केली आहे.
हत्येपूर्वी मोबाईलवर ठेवले होते स्टेटस
बुधवारी संध्याकाळी पेठवडगाव येथील एसटी स्टँडच्या पाठीमागील परिसरात हा प्रकार घडला. हत्येचा हा थरार घडण्यापूर्वी संशयित दीपक कांबळे याने आपल्या मोबाईलवर एक सूचक आणि भयानक स्टेटस ठेवले होते. आज माझा तरी शेवट नाही तर... पुढच्याचा, असे स्टेटस ठेवून त्याने काही वेळातच पत्नीची हत्या केली.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, दीपक आणि अमृता यांचा आठ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना दोन मुली आहेत. सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू असताना, गेल्या काही महिन्यांपासून दीपक अमृताच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता. याच वादातून बुधवारी अमृता एका कॉम्प्लेक्समध्ये कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांची भेट घेण्यासाठी गेल्या होत्या. पत्नी तिथे गेल्याची कुणकुण लागताच दीपक हातामध्ये धारदार कोयता घेऊन तिथे आधीच दबा धरून बसला होता. अमृता कॉम्प्लेक्सबाहेर येताच दोघांमध्ये पुन्हा जोरदार वाद सुरू झाला.
हा वाद विकोपाला गेल्यानंतर दीपकने त्याच्याजवळील कोयत्याने अमृता यांच्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या अमृता मदतीसाठी ओरडत असताना, गर्दीतील काही धाडसी तरुण त्यांना वाचवण्यासाठी पुढे सरसावले. मात्र, दीपकने रक्ताळलेला कोयता नाचवत त्या तरुणांनाही धमकावले.
ती माझी पत्नी आहे, हे आमचं अंतर्गत मॅटर आहे, तुम्ही कुणीही यामध्ये पडू नका! असे ओरडत त्याने अमृता यांच्यावर आणखी गंभीर वार केले. भररस्त्यात शेकडो लोकांदेखत घडलेल्या या हल्ल्यात गंभीर दुखापतीमुळे अमृता यांनी जागीच प्राण सोडले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयित पती दीपक कांबळेला पकडले. पोलीस पुढील तपास करत आहेत.


