पणजी : राज्यातील जमीन हडप आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) म्हापसा नगरपालिकेचे माजी नगरसेवक तारक आरोलकर, जमीन हडप प्रकरणातील मुख्य सूत्रधार सिद्दीकी उर्फ सुलेमान खान, फ्रान्सिस क्रास्टो, अहमद मोहम्मद खान आणि आसिफ सौदागर यांच्याशी निगडित गोवा तसेच कर्नाटकातील सात ठिकाणी छापे टाकले. या छाप्यात ५०० कोटींपेक्षा अधिक बाजारमूल्य असलेली मालमत्ता जप्त केली.
जमीन हडप प्रकरणातील मुख्य सूत्रधार सिद्दीकी खान उर्फ सुलेमान खान याला ईडीच्या पणजी विभागीय कार्यालयाने १६ जुलै रोजी मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार (पीएमएलए) अटक केली होती. ईडीच्या तपासात या सिंडिकेटकडून बनावट व जुन्या तारखांचे विक्री खत तसेच मालकी हक्काचे दस्तऐवज तयार केले जात असल्याचे निष्पन्न झाले होते. काही प्रकरणांमध्ये मृत व्यक्ती अथवा पूर्वजांच्या नावांचा गैरवापर करून बनावट कागदपत्रे बनवण्यात आली आणि अधिकृत जमीन नोंदींमध्ये फेरफार करून मौल्यवान जमिनींची मालकी आरोपी व त्यांच्या साथीदारांच्या नावावर हस्तांतरित करण्यात आल्याचे ईडीच्या तपासात समोर आले.
या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असताना म्हापसाचे माजी नगरसेवक तारक आरोलकर यांचाही या जमीन हडप प्रकरणात थेट सहभाग असल्याचे समोर आले. दरम्यान, त्याने या व्यवहारात आर्थिक गुंतवणूक केल्याचे समोर आले. त्यानुसार, ईडीने मंगळवार २५ आॅगस्ट रोजी तारक आरोलकर, सिद्दीकी उर्फ सुलेमान खान, फ्रान्सिस क्रास्टो, अहमद मोहम्मद खान आणि आसिफ सौदागर यांच्या गोव्यात आणि कर्नाटकातील सात ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात ५०० कोटींपेक्षा अधिक बाजारमूल्य असलेली हणजूण, हडफडे, आसगाव व इतर ठिकाणच्या जमिनीची व स्थावर मालमत्तांची तसेच आर्थिक व्यवहारांच्या संबंधित कागदपत्रे जप्त केली. याशिवाय मोबाईल, लॅपटाॅप व इतर इलेक्ट्रॅानिक वस्तू जप्त केल्या आहेत.
गुंतवणुकीशी निगडित कागदपत्रे ईडीच्या हाती
ईडीने हणजूण, हडफडे, आसगाव तसेच इतर भागांतील जमीन व स्थावर मालमत्तांशी संबंधित कागदपत्रे जप्त केली आहेत. या कारवाईदरम्यान संबंधित आर्थिक व्यवहार, मालमत्ता खरेदी-विक्री आणि गुंतवणुकीशी निगडित महत्त्वाची कागदपत्रेही ईडीच्या हाती लागली आहेत. याशिवाय तपास पथकाने मोबाईल फोन, लॅपटॉप, संगणक तसेच इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत.


