दाबोळी विमानतळ पोलिसांकडून तुषार केळकरसह काही जणांविरोधात गुन्हा

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
35 mins ago
दाबोळी विमानतळ पोलिसांकडून तुषार केळकरसह काही जणांविरोधात गुन्हा

वास्को : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे गोवा दौऱ्यावर आले असता, त्यांना दाबोळी विमानतळावर काळे झेंडे दाखविल्याप्रकरणी दाबोळी विमानतळ पोलिसांनी भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तुषार केळकर यांच्यासह काहीजणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

मल्लिकार्जुन खर्गे हे दि. १७ व १८ ऑगस्ट असे दोन दिवस गोवा दौऱ्यावर आले होते. वंदे मातरम् चा अपमान केल्याप्रकरणी त्यांना काळे झेंडे दाखविण्याचा निर्णय भाजप युवा मोर्चाने घेतला होता. त्यामुळे खर्गे यांचे १७ ऑगस्टला सायंकाळी दाबोळी विमानतळावर आगमन झाल्यावर त्यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी भाजप युवा मोर्चाचे काही पदाधिकारी व सदस्य जमा झाले होते. मल्लिकार्जुन खर्गे यांचे आगमन झाल्यावर ते वाहनाने जात असताना काहीजणांनी त्यांना काळे झेंडे दाखविले. तसेच काही झेंडे वाहनांवर फेकले. यामुळे तेथे तणाव निर्माण झाला होता. आपल्या नेत्यांना काळे झेंडे दाखविले जात असल्याची माहिती मिळताच दाबोळी विमानतळावर खर्गेच्या स्वागतासाठी आलेल्या काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांचा विरोध केला. यावेळी एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा काहीजणांनी प्रयत्न केला. तथापी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती चिघळली नाही. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करावा, अशी मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली होती. त्यानुसार, चौकशीअंती भाजप युवा मोर्चाच्या काहीजणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. 

हेही वाचा
सर्व पहा