राहत्या घरातून कुटुंबाला जबरदस्तीने बाहेर काढण्याचा प्रयत्न

धुळेर येथील प्रकार : म्हापसा पोलिसांत तक्रार दाखल

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
35 mins ago
राहत्या घरातून कुटुंबाला जबरदस्तीने बाहेर काढण्याचा प्रयत्न

म्हापसा : धुळेर म्हापसा येथील हळर्णकर कुटुंबीयांच्या घरावर एका टोळीने बेकायदेशीरपणे ताबा मिळवून घरातील महिलांवर हल्ला करीत त्यांना बेघर करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

दिनेश दिगंबर हळर्णकर, दीपरत्न हळर्णकर आणि पिंकी हळर्णकर यांनी म्हापसा पोलीस स्थानकात याबाबत फौजदारी तक्रार दाखल केली आहे. संशयित महानंद गजानन अस्नोडकर, सोनिया अस्नोडकर, शेल्डन फर्नांडिस, राज चिंचवडकर यांच्यासह त्यांनी आणलेल्या सुमारे २० भाडोत्री गुंडांवर गुन्हा नोंदवण्याची मागणी फिर्यादींनी पोलिसांकडे केली आहे.

दि. १८ जुलै २०२६ रोजी पोलिसांत लेखी तक्रार दाखल केली होती. तसेच तक्रारीसोबत घटनेच्या दिवशीचा चित्रीकरण केलेला व्हिडीओही पुरावा म्हणून पोलिसांना सादर केला होता. मात्र, पोलिसांनी अद्याप कोणतीही कायदेशीर कारवाई केलेली नाही.

तक्रारीनुसार, धुळेर-म्हापसा येथील घर क्र. २/१३४/१ (चलता क्र. ३४, पी.टी. शीट क्र. ७३) या जागेवर हळर्णकर कुटुंब गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ वास्तव्यास असून व्यवसाय करत आहे. संशयितांनी सशस्त्र टोळीच्या मदतीने या मालमत्तेत बेकायदेशीर प्रवेश करून हळर्णकर कुटुंबीयांना जबरदस्तीने घराबाहेर काढले व जिवे मारण्याची धमकी दिली.

घराचा मुख्य मार्ग बंद करण्यासाठी संशयितांनी जांभा दगड आणि सिमेंटचे पक्के बांधकाम करून रस्ता अडवला. या झटापटीत संशयितांनी ज्येष्ठ नागरिक असलेल्या दीपरत्न हळर्णकर आणि पिंकी हळर्णकर यांना बेदम मारहाण केली. मारहाणीत त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.

पोलिसांकडे तक्रार केल्यास अथवा घर पूर्णपणे रिकामे न केल्यास जीवे मारण्याची धमकी या टोळीने दिली आहे. या कृत्यामुळे हळर्णकर कुटुंबीयांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून त्यांचा उदरनिर्वाहाचा मार्गही हिरावून घेण्यात आला आहे.

घरातून दागिने, फर्निचरची चोरी

घरातून सोन्याचे दागिने, अवजारे, यंत्रसामग्री, उपकरणे व फर्निचर अशी मौल्यवान मालमत्ता चोरून नेल्याचा आरोपही हळर्णकर कुटुंबीयांनी तक्रारीत केला आहे. या सर्व संशयितांविरोधात त्वरित गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी म्हापसा पोलिसांकडे केली आहे. 

हेही वाचा
सर्व पहा