पणजी : गोवा ऑलिम्पिक असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पणजी येथे पार पडली, ज्यामध्ये २०२६-२०३० या नव्या सत्रासाठी नवीन कार्यकारी समितीची निवड करण्यात आली आहे. या निवडणुकीत राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी असोसिएशनच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. विठ्ठल नाईक यांनी अधिकृत निकाल जाहीर केल्यानंतर नवीन पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला.
यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष सादानंद शेट तानावडे यांनी, खेळाडूंसाठी दर्जेदार सहाय्यक प्रणाली तयार करणे आणि गोव्यात ‘ऑलिम्पिक भवन’ उभारण्याच्या जुन्या स्वप्नाला पूर्ण करणे याला प्राधान्य दिले जाईल, असे स्पष्ट केले. भारताने २०२६ मध्ये ऑलिम्पिकचे यजमानपद भूषवल्यास गोव्यात किमान एक मोठी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याचा प्रयत्न केला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
याशिवाय, युवा प्रतिभांचा शोध घेऊन त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर तयार करण्यासाठी सर्व संलग्न संघटनांनी अधिक मेहनत घेण्याचे आवाहन त्यांनी केले. सीएसआर निधीचा वापर आणि क्रीडा संघटनांचे आर्थिक दस्तऐवज अद्ययावत ठेवण्यावरही त्यांनी भर दिला. तसेच लवकरच गोवा ऑलिम्पिक असोसिएशनचे स्वतंत्र कार्यालय सुरू होईल, अशी घोषणाही त्यांनी केली.
समित्यांची स्थापना आणि महत्त्वाच्या घोषणा सभेत ऑलिम्पिक भवन निर्माण समिती, सीएसआर नोंदणी समिती आणि घटना दुरुस्ती समितीची स्थापना करण्यात आली. या बैठकीत क्रीडा प्राधिकरण (साग) ऑब्झर्व्हर डॉ. अजय आर. गौडे यांनी राष्ट्रीय स्पर्धांच्या प्रलंबित मंजुरीसाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलेल्या सहकार्याचे कौतुक केले. तसेच, राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी संघ पाठवणाऱ्या क्रीडा संघटनांचे थकीत अनुदान लवकरच वितरीत केले जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. गोव्यात लवकरच नॅशनल सेंटर ऑफ एक्सेलन्स सुरू होणार असून, केंद्रीय मंत्रालयाकडून त्याला तत्त्वतः मान्यता मिळाली आहे.
यावेळी असोसिएशनसाठी उत्कृष्ट सेवा देणारे माजी पदाधिकारी आणि सदस्यांचा सत्कारही करण्यात आला. तसेच, नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून goaolympic.com ही नवीन आधुनिक डिजिटल वेबसाईट तयार करण्यात येत असल्याची माहिती महासंचिव संदीप हेबळे यांनी दिली. याद्वारे खेळाडूंना डिजिटल प्रोफाईल, रेकॉर्ड आणि क्रीडा क्षेत्रातील संधींची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
नवीन कार्यकारी समिती (२०२६-३०)
अध्यक्ष: सदानंद शेट तानावडे, उपाध्यक्ष: डॉ. कैतानो फर्नांडिस, संध्या पालेकर, सुदेश ठाकूर आणि भागेश्री पडलोसकर, महासचिव: संदीप हेबळे, खजिनदार: जयेश नाईक, सहसचिव: मनोज पाटील, कार्यकारिणी सदस्य: रुक्मिणी कामत, नवीन पै रायकर, अभय भामईकर, विप्लव भक्त आणि अखिल पर्रीकर.

