ट्रम्प यांचा इराणाला इशारा : १ हजार क्षेपणास्त्रे सज्ज

वॉशिंग्टन : अमेरिका आणि इराणमधील तणाव पुन्हा एकदा तीव्र झाला असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कठोर इशारा दिला आहे. आपल्यावर हल्ला करण्याचा कोणताही प्रयत्न झाल्यास इराणला "पूर्णपणे चिरडून टाकू" असा इशारा ट्रम्प यांनी दिला. (Trump threatens to ‘decimate’ Iran if it tries to kill him) त्यांनी दावा केला की, इराणच्या दिशेने १,००० क्षेपणास्त्रे सज्ज असून गरज पडल्यास आणखी हजारो क्षेपणास्त्रे तैनात केली जातील.
इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिका अंतरिम सामंजस्य करारातील (MoU) वचनांचे पालन करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे. अमेरिकेच्या भूमिकेमुळे द्विपक्षीय विश्वासाला तडा गेल्याचे त्यांनी सांगितले.
अमेरिका होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या व्यापारी जहाजांवर इराणकडून कोणताही हल्ला होणार नसल्याची सार्वजनिक हमी मिळविण्याचा प्रयत्न करत असल्याचे वृत्त आहे. जगातील महत्त्वाच्या तेलवाहतुकीचा मार्ग असलेल्या या सामुद्रधुनीतील कोणताही तणाव जागतिक ऊर्जा बाजारावर परिणाम करू शकतो.
जशास तसेच उत्तर देण्याचा इराणचा इशारा
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयानेही स्पष्ट इशारा दिला आहे की, अमेरिकेने सामंजस्य कराराचे उल्लंघन केल्यास त्याला "जशास तसे उत्तर" दिले जाईल.
दरम्यान, तणाव कमी करण्यासाठी कतारचे मध्यस्थ तेहरानमध्ये राजनैतिक चर्चा करत असून, शनिवारी ओमानमध्ये अमेरिका आणि इराणदरम्यान स्वतंत्र चर्चेची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत या संघर्षाच्या दिशेबाबत महत्त्वाची घडामोड होण्याची शक्यता आहे.