Home >> देश -परदेश >> अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी मुलीनेच रचला जन्मदात्या आईच्या हत्येचा कट

अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी मुलीनेच रचला जन्मदात्या आईच्या हत्येचा कट

७ लाखांची सुपारी देऊन घडवला अपघात

Story: गोवन वार्ता । न्यूज डेस्क |
3 hours ago
अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी मुलीनेच रचला जन्मदात्या आईच्या हत्येचा कट

जयपूर: अनुकंपा तत्त्वावरील सरकारी नोकरी आणि मालमत्ता हस्तगत करण्यासाठी एका २३ वर्षांच्या मुलीनेच आपल्या जन्मदात्या आईची ७ लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याची खळबळजनक घटना जयपूरमधील प्रताप नगर भागात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी मुलीसह सात जणांना अटक केली असून, एक आरोपी अद्याप फरार आहे.
नीरज शर्मा (वय ४५) असे मृत महिलेचे नाव असून, त्या न्यायालयात कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होत्या. ३ जुलै रोजी कारने चिरडून त्यांची हत्या करण्यात आली होती. सुरुवातीला हा अपघात वाटत असला, तरी पोलिसांच्या सखोल तपासात हा एक पूर्वनियोजित खून असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जुलै रोजी नीरज शर्मा या आपल्या मुलाला कोचिंग क्लासमध्ये सोडून पायी घरी परतत होत्या. त्याच वेळी ताशी १३० किमी प्रतितास इतक्या प्रचंड वेगाने आलेल्या एका स्कॉर्पिओ कारने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, नीरज या सुमारे १०० फूट दूर फेकल्या गेल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर चालक गाडीसह फरार झाला होता. मात्र, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना घातपाताचा संशय आला आणि या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.
डीसीपी रंजिता शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, नीरज यांच्या पतीचे वर्षभरापूर्वी निधन झाले होते. पतीच्या निधनानंतर नीरज यांना अनुकंपा तत्त्वावर न्यायालयात नोकरी मिळाली होती. मात्र, मुलगी आयुषी शर्मा (वय २३) हिची स्वतःची ती सरकारी नोकरी मिळवण्याची इच्छा होती. आईने स्वतः नोकरी स्वीकारल्यामुळे आयुषी तिच्यावर नाराज होती. याशिवाय, गेल्या २-३ वर्षांपासून आई आणि मुलीमध्ये मालमत्तेवरूनही तीव्र वाद सुरू होता.
नोकरी आणि मालमत्तेच्या हव्यासापोटी आयुषीने तिचे काका मोहन स्वरूप आणि चुलत भाऊ बलराम ऊर्फ रवी यांच्याशी हातमिळवणी करून आईला संपवण्याचा कट रचला.
आईच्या हत्येसाठी त्यांनी भरतपूर येथील हेमंत शर्मा याला ७ लाख रुपयांची सुपारी दिली. आरोपींनी सुरुवातीला भाड्याने घेतलेल्या ‘थार’ गाडीतून नीरज यांची रेकी केली. त्यानंतर महिनाभर त्यांच्या हालचालींवर पाळत ठेवून अखेर स्कॉर्पिओ कारने धडक देण्याचा कट निश्चित केला. ३ जुलै रोजी हेमंत शर्मा नीरज यांच्यावर पाळत ठेवून होता. रोहित जाटव हा दुचाकीसह जवळच सज्ज होता, तर आकाश शर्मा हा स्कॉर्पिओ चालवत होता आणि अरविंद शर्मा त्याच्यासोबत गाडीत बसला होता. नीरज यांना चिरडल्यानंतर आरोपींनी स्कॉर्पिओ घटनास्थळीच सोडली आणि दुचाकीवरून पळ काढला.
नीरज यांचे भाऊ राकेश कुमार शर्मा यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलीस तपासात समोर आले आहे की, नीरज शर्मा यांनी यापूर्वीच आपली मुलगी, सासरचे लोक आणि चुलत भावाकडून मालमत्तेसाठी छळ होत असल्याची आणि जिवे मारण्याच्या धमक्या येत असल्याची तक्रार पोलिसांत नोंदवली होती.
सात जणांना बेड्या, मुख्य सूत्रधार फरार
पोलिसांनी याप्रकरणी तत्परता दाखवत आयुषी शर्मा, मोहन स्वरूप, मोहित शर्मा, आकाश शर्मा, अरविंद शर्मा, हेमंत शर्मा आणि रोहित जाटव अशा सात आरोपींना अटक केली आहे. या कटातील मुख्य सूत्रधार मानला जाणारा चुलत भाऊ बलराम ऊर्फ रवी हा सध्या फरार असून, पोलीस त्याचा युद्धपातळीवर शोध घेत आहेत.

हेही वाचा
सर्व पहा