Home >> देश -परदेश >> होर्मुझ सामुद्रधुनीत युद्ध: अमेरिकेचे हवाई हल्ले, इराणचे क्षेपणास्त्रांनी प्रत्युत्तर

होर्मुझ सामुद्रधुनीत युद्ध: अमेरिकेचे हवाई हल्ले, इराणचे क्षेपणास्त्रांनी प्रत्युत्तर

नऊ भारतीय जहाजे अडकली; भारताशी संबंधीत चाबहार बंदरावर अमेरिकेचे हल्ले

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
12 hours ago
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्ध: अमेरिकेचे हवाई हल्ले, इराणचे क्षेपणास्त्रांनी प्रत्युत्तर

तेहरान/वॉशिंग्टन : होर्मुझ सामुद्रधुनीतील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. अमेरिकेने गुरुवारी पहाटे इराणवर नव्याने हवाई हल्ले केल्यानंतर इराणने बहरीन, कुवेत आणि कतारमधील अमेरिकी लष्करी तळांवर क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ले चढवले. या घडामोडींमुळे पर्शियन आखातातील तात्पुरत्या युद्धविरामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

होर्मुझ सामुद्रधुनीतील व्यापारी जहाजांची वाहतूक जवळपास ठप्प झाली आहे. (Traffic in Hormuz 'grinds to a halt' as US-Iran trade strikes; 9 Indian ships stuck)  या परिस्थितीत नऊ भारतीय व्यापारी जहाजेही या मार्गात अडकली असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेने भारताशी संबंध असलेल्या इराणातील चाबहार बंदरावर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. त्यात बरेच नुकसान झाल्याची माहिती आहे. 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)  यांनी इराणने व्यापारी जहाजांवर केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले. इराणने ओमानच्या किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजांना लक्ष्य करून आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीला धोका निर्माण केल्याचा अमेरिकेचा आरोप आहे.

अमेरिकी लष्कराने या हल्ल्यांचा उद्देश होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांना धोका निर्माण करण्याची इराणची क्षमता कमकुवत करणे असल्याचे स्पष्ट केले. युद्ध सुरू होण्यापूर्वी जगातील सुमारे २० टक्के कच्चे तेल आणि द्रवीकृत नैसर्गिक वायू (LNG) याची याच सामुद्रधुनीतून वाहतूक होत होती.

इराणी सरकारी माध्यमांनी बुशेहर, चाबहार, कोनारक, बंदर अब्बास आणि सिरिक या भागांत स्फोट झाल्याचे वृत्त दिले. दुसरीकडे बहरीनमध्ये दोनदा हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन वाजवण्यात आले.  कुवेतने आपल्या हवाई संरक्षण यंत्रणेने अनेक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हवेतच निष्प्रभ केल्याचा दावा केला. कतारमध्येही सतर्कता वाढवण्यात आली असून तातडीने कोणतीही मोठी जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

व्यापारी जहाजांवरील हल्ल्याचे गंभीर परिणाम होणार : ट्रम्प

ट्रम्प यांनी सोशल मीडियावर इराणमधील स्फोटांचे व्हिडिओ शेअर करत, व्यापारी जहाजांवरील हल्ले पुन्हा झाल्यास त्याचे परिणाम अधिक गंभीर होणार, असा इशारा दिला.  इराणची वीज व्यवस्था, क्षारनिर्मूलन प्रकल्प आणि प्रमुख तेल निर्यात केंद्र असलेल्या खार्ग बेटालाही लक्ष्य करण्याचा इशाराही त्यांनी पुन्हा दिला.

अमेरिकेने हल्ला केल्यास मिळणार प्रत्युत्तर : इराण 

दरम्यान, इराणचे संसदाध्यक्ष मोहम्मद बाघेर काल‌िबफ (Mohammad Bagher Qalibaf)  यांनी अमेरिकेला कठोर इशारा देत, "अमेरिकेने हल्ला केला तर त्याला प्रत्युत्तर मिळणारच," असे स्पष्ट केले.

जागतिक ऊर्जा, तेलाच्या किमतीवर परिणामाची शक्यता 

या नव्या संघर्षामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतील जहाजांची वाहतूक विस्कळीत झाली असून जागतिक ऊर्जा पुरवठा, तेलाच्या किमती आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावर त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतीय जहाजे अडकल्याने भारताच्या सागरी व्यापारावरही परिस्थितीचा परिणाम होऊ शकतो.

हेही वाचा
सर्व पहा