पूर, दरडी, इमारती कोसळल्या, वाहतूक विस्कळीत

नवी दिल्ली : देशभर सुरू असलेल्या मुसळधार मान्सून पावसामुळे अनेक राज्यांमध्ये पूर, दरडी कोसळणे, पाणी साचणे आणि वाहतूक विस्कळीत होण्याच्या घटना घडत आहेत. (Monsoon Havoc Hits India; Floods Disrupt Transport, Claim Lives). महाराष्ट्र, गुजरात, केरळ, दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थानमध्ये जनजीवन मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले असून अनेक ठिकाणी जीवितहानीची नोंद झाली आहे.
गुजरातमध्ये नऊ जणांचा मृत्यू
गुजरातमधील सुरतमध्ये अवघ्या २४ तासांत ३५८ मिमी पावसाची नोंद झाली. शहरातील सखल भाग जलमय झाले असून हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. पावसाशी संबंधित दुर्घटनांमध्ये आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात ११ जण ढिगाऱ्याखाली अडकले
महाराष्ट्रातील पिंपरी-चिंचवड येथील मोशी परिसरात कचऱ्याचा प्रचंड ढिगारा तीन मजली इमारतीवर कोसळल्याने इमारत जमीनदोस्त झाली. या दुर्घटनेत ११ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. मुंबईत मुसळधार पावसामुळे उपनगरी रेल्वे सेवा उशिराने धावल्या, अनेक भागांत पाणी साचले, तर खराब हवामानामुळे नऊ विमाने अन्य विमानतळांकडे वळवावी लागली. भोर घाटातील दरडी आणि वसई–विरार मार्गावरील पाणी साचल्याने रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला.
वायनाड येथे ५ जणांचा मृत्यू; ५ अजून बेपत्ता
केरळमधील वायनाड येथे बोगदा प्रकल्पाजवळ मातीचा ढिगारा कोसळल्याने पाच जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. जम्मू-काश्मीरमधील डोडा येथे अचानक आलेल्या पुरामुळेही मोठे नुकसान झाले आहे.
दिल्लीत इमारत कोसळून एक ठार; अनेकजण अडकल्याची भीती
दिल्लीत मुसळधार पावसामुळे अनेक भाग जलमय झाले असून वाहतूक ठप्प झाली. रोहिणी येथे बांधकामाधीन इमारत कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. हवामान विभागाने दिल्लीसह अनेक भागांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
उत्तराखंडमध्ये ७० रस्ते बंद; शाळांना सुट्टी
हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थानमध्येही अतिवृष्टीमुळे दरडी कोसळणे, रस्ते बंद होणे आणि पूरस्थिती निर्माण झाली आहे. उत्तराखंडमध्ये सुमारे ७० रस्ते बंद झाले असून देहरादूनसह काही जिल्ह्यांतील शाळांना गुरुवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
अमित शहांचे मुख्यमंत्र्यांना मदतीचे आश्वासन
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र, गुजरात, केरळ आणि जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून परिस्थितीचा आढावा घेत केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे.
पावसाचा इशारा; सतर्क राहण्याचे आवाहन
हवामान विभागाने पुढील काही दिवस अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.