Home >> गोवा >> दवंडे-फातोर्डातील प्रकल्पाविरोधात नागरिकांचा मोर्चा

दवंडे-फातोर्डातील प्रकल्पाविरोधात नागरिकांचा मोर्चा

पालिकेकडून १५ दिवसांत पाहणीअंती निर्णय घेण्याचे आश्वासन

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
5 hours ago
दवंडे-फातोर्डातील प्रकल्पाविरोधात नागरिकांचा मोर्चा

मडगाव : दवंडे-फातोर्डा येथील मेगा प्रकल्पांविरोधात (Mega project at Davande-Fatorda)  स्थानिकांनी एकत्र येत मडगाव पालिकेवर मोर्चा काढला. दोन महिन्यांपूर्वी याठिकाणी येणार्‍या २९४ फ्लॅटच्या प्रकल्पाला विरोध केला होता. आता आणखी प्रकल्प येत असून त्याला स्थानिकांचा विरोध आहे. हे प्रकल्प रद्द करण्यात यावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली. स्थानिकांनी दिलेले निवेदन एसजीपीडीएला पाठवून देण्यात येईल, असे मुख्याधिकार्‍यांनी सांग‌ितले. १५ दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

दवंडे-फातोर्डा परिसरात प्रस्तावित मेगा प्रकल्पांविरोधात स्थानिकांनी एल्गार पुकारला आहे. या प्रकल्पांमुळे गावचे गावपण नष्ट होणार असून स्थानिकांच्या हातातून गाव निसटणार असल्याची भीती व्यक्त करत प्रकल्पांना विरोध दर्शवण्यात आला. दवंडेतील नागरिकांनी प्रकल्पाच्या स्थळापासून मडगाव पालिकेपर्यंत मोर्चा काढला व प्रकल्पाला विरोध असल्याच्या घोषणा दिल्या.

दवंडे हा गाव फातोर्डा परिसरातील छोटा गाव आहे. याठिकाणी पाण्याचा प्रश्न कायम आहे. दवंडे गावात एकूण पाच प्रकल्प येऊ घातले आहेत. याशिवाय फातोर्डा परिसरात आणखीही प्रकल्प येत आहेत. मैदानानजीकच्या जागेत सर्वात मोठा प्रकल्प येत आहे. त्यामुळे फातोर्डा मतदारसंघातील लोकांनी एकत्र येत या प्रकल्पांना विरोध दर्शवावा, असे आग्नेल फर्नांडिस यांनी सांगितले.

 दवंडे गावातील लोकांनी एकत्र येत मडगाव पालिकेवर मोर्चा काढला. यावेळी मडगाव पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांच्या उपस्थितीत काही नागरिकांच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी मधु नार्वेकर यांची भेट घेतली. 

 मुख्याधिकारी मधु नार्वेकर यांनी सांगितले की, दवंडे येथील प्रकल्पाच्या जागेवर होर्डींग लावण्यात आलेले होते. या प्रकरणी याआधीही निवेदन दिलेले होते. त्यानंतर पालिकेकडून पाहणी करत ते काढण्यास सांगण्यात आले होते. आता नागरिकांच्या शिष्टमंडळाने पालिकेकडून करण्यात आलेल्या पत्रव्यवहाराचे उत्तर सादर केले आहे.

पालिकेकडून कोणत्याही प्रकल्पाला परवानगी देण्यात आलेली नाही. एसजीपीडीएकडून याआधी परवानगी देण्यात आली होती. त्या आधारे प्रकल्पाच्या जागेवर पत्रे उभारणी केली आहे. आता नागरिकांकडून आलेल्या निवेदनाची प्रत एसजीपीडीएला पाठवून देण्यात येईल.

हेही वाचा
सर्व पहा