एससीईआरटीकडून शाळांच्या मुख्याध्यापकांना सूचना

पणजी : विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करून वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी राज्यातील शाळांनी नियमित वृत्तपत्र वाचन उपक्रम सुरू करावा, अशा सूचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण मंडळाने (एससीईआरटी) सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. यासंदर्भातील परिपत्रक एससीईआरटीने जारी केले असून, शाळांच्या ग्रंथालयांमध्ये मराठी, कोकणी, इंग्रजी आणि हिंदी भाषेतील वृत्तपत्रे उपलब्ध करून विद्यार्थ्यांना ती नियमित वाचता येतील, याची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान वाढविण्यासोबतच विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी वृत्तपत्र वाचन उपयुक्त ठरते. तसेच भाषाज्ञान, शब्दसंपदा आणि व्याकरणाची समज विकसित होण्यासही या उपक्रमाचा मोठा फायदा होणार असल्याचे एससीईआरटीने नमूद केले आहे.
एससीईआरटीने केलेल्या सूचना
शाळांच्या ग्रंथालयात मराठी, कोकणी, इंग्रजी व हिंदी भाषेतील वृत्तपत्रे उपलब्ध करून द्यावीत.
सकाळच्या प्रार्थनासत्रात वृत्तपत्र वाचनासाठी दररोज १० मिनिटांचा वेळ द्यावा.
वृत्तपत्रातील पाच कठीण शब्द निवडून त्यांचे अर्थ विद्यार्थ्यांना समजावून सांगावेत.
वृत्तपत्राच्या धर्तीवर विद्यार्थ्यांनी शाळेवर आधारित स्वतःचे वृत्तपत्र तयार करावे.
इयत्ता ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांनी वृत्तपत्रातील निवडक विषयांवर स्वतःची मते लेखी स्वरूपात मांडावीत.
वृत्तपत्रांतील कोडी, शब्दकोडी आणि पझल्स सोडविण्याच्या स्पर्धा आयोजित कराव्यात.
विज्ञान, पर्यावरण आणि क्रीडा विषयक महत्त्वाच्या बातम्यांची कात्रणे गोळा करून विषयनिहाय पुस्तिका तयार करावी.